ठाकरे गटाच्या अडचणी काही केल्या थांबेनात! धनुष्यबाण चिन्ह गमावल्यानंतर आता 'मशाल'ही जाणार?
केंद्रीय निवडणूक आयोग तसचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत दिलासा न मिळाल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर झालेल्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र येथे देखील शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र करण्याची याचिका फेटाळण्यात आली आहे. बुधवारी शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल लागला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल देताना ठाकरे गटाला मोठा धक्का देत शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा निर्णय दिला.
शिवसेना अपात्रता प्रकरणाचा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागल्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून निराशा व्यक्त करण्यात आली आहे. या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांकडून संतापही व्यक्त केला जात आहे. अशातच उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात असून ठाकरे गटाच्या सध्याच्या मशाल चिन्हावर समता पक्षाने दावा केला आहे.
शिवसेना पक्ष शिंदेंकडे गेल्यानंतर निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल हे चिन्हं दिलं होते. मात्र आता मशाल चिन्हही ठाकरेंच्या हातातून जाणार की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. समता पक्षाने मशाल चिन्हावर दावा केला आहे. निवडणूक आयोगाच्या नव्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे मशाल चिन्हासाठी अर्ज करण्याचा अधिकार असल्याचे समता पक्षाने म्हटले आहे.
४ जानेवारी २०२४ रोजी निवडणूक आयोगाने नोंदणीकृत पण मान्यता नसलेल्या पक्षांना चिन्ह देण्याबाबत प्रक्रिया सुरू केली आहे. आजपासून (११ जानेवारी २०२४) ज्या पक्षांना कॉमन पक्ष चिन्ह हवे असेल त्यांना दिले जाईल, असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. त्यामुळे समता पक्ष आता चिन्हासाठी आयोगाकडे अर्ज करणार आहे. तसेच चिन्हासाठीच्या सर्व अटी पूर्ण केल्या असल्याचाही दावा समता पक्षाने केला आहे.
दरम्यान, याआधीही समता पक्षाने मशाल चिन्हावर दावा केला होता. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल चिन्ह दिल्यानंतर समता पक्षाने सुप्रीम कोर्टातही धाव घेतली होती. त्यामुळे आता ठाकरेंकडे मशाल चिन्ह राहणार की जाणार? समता पक्षाच्या मागणीवर निवडणूक आयोग काय निर्णय देणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.