बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 3 जुलै 2023 (23:08 IST)

अजित पवार बंड : सरकारमध्ये सहभागी झालेले 'हे' नेते तपास यंत्रणांच्या रडारवर

ajit panwar
2 जुलै 2023 रोजी अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली.
 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नेत्यांवर याआधी भाजपकडून भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले होते, तर काहींच्या मागे तपास यंत्रणांचा ससेमिराही सुरु होता.
 
राष्ट्रवादीचे हे नेते कोणते आणि त्यांच्यावर कोणते आरोप करण्यात आले होते हे पाहूया.
 
अजित पवार
2 जुलै 2023 रोजी झालेल्या शपथविधीनंतर अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. पण अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप भाजपकडून याआधी करण्यात आलेले होते. तसंच, साखर कारखान्यांशी संबंधित प्रकरणांत ईडी त्यांच्याजवळ येऊन ठेपली होती.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घरी आयकर विभागाने मार्च 2022 मध्ये छापेमारी केली. यात काही संपत्तीवर आयकर विभागाने जप्तीची कारवाई केल्याची माहिती समोर आली होती.
 
अजित पवारांशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली होती.
 
भाजप नेते नेते किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी आरोप केले होते. अजित पवार यांची आर्थिक उलाढाल आश्चर्यकारक आहे, असं सोमय्या म्हणाले होते. बिल्डरांकडून त्यांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या खात्यात शंभर कोटींहून अधिकची अपारदर्शक बेनामी संपत्ती असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.
 
राज्याच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांना क्लिन चीट दिली होती. पण अंमलबजावणी संचलनालयाने मे 2020 विदर्भ सिंचन घोटाळ्याप्रकरणी पुन्हा नव्याने चौकशी सुरू केली होती.
 
तसंच, आयकर विभागाने अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीवर छापेमारी केली होती.
 
दरम्यान, अजित पवार यांच्या नातेवाईकांवरील या छापेमारेतून आयकर विभागाने 184 कोटी रुपयांची बेनामी आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा केला होता.
 
मात्र, एप्रिल 2023 मध्ये टाईम्स आँफ इंडिया या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, ईडीने राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या संदर्भात अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित एका कंपनीविरोधात चार्जशिट दाखल केली. पण त्यामध्ये अजित पवार आणि सुनेत्रा पवारांचं नाव मात्र घेण्यात आलं नव्हतं.
 
यानंतरच राष्ट्रवादीतल्या बंडाची चर्चा सुरु झाली होती. या बातमीवर अजित पवार यांनी पुढे येऊन स्पष्टीकरणही दिलं होतं.
 
छगन भुजबळ
2014 मध्ये सत्तांतर झाल्यानंतर भुजबळांभोवतीचा फास आवळला जाऊ लागला. त्यांना मार्च 2016 मध्ये दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली. त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली. अनेकवेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नाही.
 
मात्र, सप्टेंबर 2021 मध्ये महाराष्ट्र सदनाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
 
मुंबई सत्र न्यायालयाने छगन भुजबळ यांच्यासह 6 आरोपींना दोषमुक्त केलं.
 
भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात महाराष्ट्र सदन कथित गैरव्यवहार प्रकरणी पुरावे असल्याचा एसीबीचा दावा होता.
 
मात्र, याव्यतिरिक्त छगन भुजबळ यांच्यावर आणि त्यांच्याशी संबंधित लोकांवर वेगवेगळ्या प्रकरणांत कोर्टांमध्ये केसेस दाखल असून त्यांच्या सुनावण्या पेंडींग आहेत. इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राच्या एका रिपोर्टनुसार मनी लॉन्ड्रिंगचा आरोप करणारा वेगळा गुन्हाही ईडीने दाखल केला होता.
 
या वर्षी जानेवारी महिन्यात एका सामाजिक कार्यकर्त्याने 2021 सालच्या न्यायालयाच्या आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते, जे प्रलंबित आहे. भुजबळयांच्याविरोधात ईडीच्या प्रकरणाव्यतिरिक्त एक खटला प्रलंबित आहे. मुंबई विद्यापीठ भ्रष्टाचार प्रकरणी एसीबीने दाखल केलेला एक खटला विशेष न्यायालयात प्रलंबित आहे.
 
अदिती तटकरे
अदिती तटकरे या राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत.
 
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांच्यासह सुनील तटकरे यांचीच एसीबीकडून चौकशी सुरू होती. एसीबीने 2017 मध्ये दाखल केलेल्या आरोपपत्रात त्यावेळी आरोपी म्हणून नसले तरी तटकरे यांच्या नावाचा उल्लेख होता. त्यानंतर स्वतंत्र आरोपपत्र दाखल करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले होते.
 
याच प्रकरणात ईडीने 2012 मध्ये तटकरे यांच्याविरोधात प्राथमिक चौकशी सुरू केली होती.
 
धनंजय मुंडे
2021 साली धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्कराचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र त्यांनंतर तिने ही तक्रार मागे घेतली.
प्रफुल्ल पटेल
2 जुलै रोजी प्रफुल्ल पटेल यांनी शपथ घेतली नसली तरीही शपथविधीच्या कार्यकर्माला ते उपस्थित होते.
 
यूपीए सरकारच्या काळात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री होते. 2008-09 च्या काळात परदेशी विमान कंपन्यांना फायदा मिळवून देण्यासाठी दीपक तलवार यांच्याशी संपर्कात होते. आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असलेले काही हवाई मार्ग दीपक तलवारने तीन आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना मिळवून दिले.
 
त्याबद्दल दीपक तलवार यांना 272 कोटी रूपये मिळाले. यामुळे एअर इंडियाचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते.
 
हे सर्व व्यवहार प्रफुल्ल पटेल केंद्रीय मंत्री असताना त्यांच्या काळात झाल्याचा आरोप ईडीने लावला होता.
 
याचबरोबर आर्थिक परिस्थिती नसताना 70 हजार कोटी रूपयांची 111 विमानांची खरेदी, एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन्सचे विलिनीकरण या प्रकरणाचा तपास ईडीकडून करण्यात येत होता. याप्रकरणी ईडीने जून 2019 मध्ये प्रफुल्ल पटेल यांना नोटीस बजावली होती. त्यांना चौकशीसाठीही बोलवण्यात आले होते.
 
एकनाथ शिंदे यांच्या बंडातील ईडीच्या रडारवरचे नेते कोण?
2022 साली महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 37 आमदार असल्याचा त्यांचा दावा होता. या बंडात शिंदेंसोबत सहभागी झालेल्या नेत्यांपैकी ईडीच्या रडारवर असलेले नेतेदेखील होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडातील ईडीच्या रडारवरचे नेते कोण नेते होते, हे सुद्धा बघूया.
 
प्रताप सरनाईक
 
कथित एनएससीएल घोटाळ्याप्रकरणी सरनाईक ईडीच्या रडारवर होते. त्यांची मालमत्ता ईडीनं जप्त केली होती.
 
NSCL प्रकरणातील आस्था ग्रुपने 21.74 कोटी रूपये विहंग आस्था हाऊसिंगमध्ये ट्रान्सफर केले होते. यातील 11.35 कोटी रूपये विंहग एंटरप्रायझेस आणि विहंग इम्फ्रा या कंपन्यांना देण्यात आले होते असं ईडीचं म्हणणं होतं. या दोन्ही कंपन्या प्रताप सरनाईक यांच्या नियंत्रणात आहेत.
 
ईडीच्या कारवाईनंतर सरनाईक यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहीलं होतं. त्यात ते सरनाईक म्हणाले होते, "सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी आपलेच कार्यकर्ते फोडत असेल, आपला पक्ष कमकुवत करत असेल तर या स्थितीत पुन्हा एकदा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतेलेले बरे, असे माझे वैयक्तिक मत आहे."
 
"निदान यामुळे सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे," असंही पुढे प्रताप सरनाईक म्हणाले होते.
 
यामिनी जाधव
 
शिवसेना आमदार यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते. यशवंत जाधवही आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या रडारवर आहेत.
 
काही महिन्यांपूर्वी आयकर विभागाने जाधव यांच्यावर छापेमारी केली होती. यात 40 प्रॅापर्टी जप्त करण्यात आल्या होत्या. यानंतर ईडीने जाधव यांना मनी लॅांडरिंग प्रकरणी चौकशीसाठी नोटीस बजावली होती.
 
मात्र तक्रारीनंतर यशवंत जाधव यांच्याविरोधात अजून एफआयआर दाखल न करण्यात आल्याचं इंडीया टूडे या वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीमध्ये म्हटलेलं आहे.
 
भावना गवळी
 
शिनसेना खासदार भावना गवळी यांनी शिंदे गटाला समर्थन दर्शवलं आहे.
 
उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात त्या म्हणल्या होत्या की, "आपल्या पक्षातील मावळे हिंदुत्वाच्या मुद्यावर आपणास निर्णय घेण्याचीव विनंती करीत आहेत. हे सर्व शिवसेनेचे शिलेदार हाडामासाचे शिवसैनिक आहेत.
 
त्यांच्या भावना समजून आपण त्यांच्यावर कुठलीही कार्यवाही न करता शिवसेनेसाठी निर्णय घ्यावा"
 
भावना गवळी ईडीच्या रडारवर आहेत. त्यांना चौकशीसाठी ईडीकडून समन्स बजावण्यात आलं होतं.
 
गवळींच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टमधील गैरव्यवहार प्रकरणी ईडीने नोव्हेंबर 2022 महिन्यात आरोपपत्र दाखल केलं होतं. या कथित गैरव्यवहारप्रकरणी सईद खान हे भावना गवळी यांचे निकटवर्तीय ED च्या अटकेत होते. काही काळाने त्यांना जामीन मिळाला.
 
त्याची 3.5 कोटी रूपयांची मालमत्ता ईडीने तात्पुरती जप्त केली आहे.
 
सईद खान महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टचे संचालक आहेत. ईडीच्या दाव्यानुसार, महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टला कंपनीत बदलण्याचं षड्यंत्र विचारपूर्वक रचलेलं होतं. ट्रस्टमधून पैशांची अफरातफर करण्यासाठी हे करण्यात आल्याचं ईडीचं म्हणणं आहे.
 



Published By- Priya Dixit