रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 25 जून 2022 (09:02 IST)

आणि अजित पवार यांना आठवण झाली पहाटेच्या शपथविधीची

devendra fadnavis ajit panwar
शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी पुकारलेलं बंड आणि त्यासंदर्भातील सल्लामसलत करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर अजित पवारांनी यशंवतराव चव्हाण सभागृहाबाहेर पत्रकारांशी संवाद साधला. “२५ पक्ष घेऊन वाजपेयी यांनी सरकार चालवलं होतं. चालवलं होतं ना? त्यानंतर १० वर्ष काँग्रेसचं सरकार होतं. तेव्हा त्यात किती पक्ष होते? बरेच पक्ष होतं ना?”, असे प्रतिप्रश्न उत्तर देताना अजित पवारांनी विचारले. तीन पक्षांच्या सरकारपेक्षा दोन पक्षांचं सरकार चांगलं असं तुम्ही पहिल्यांदा शपथ घेतल्यानंतर म्हणाला होता, असं पत्रकार म्हणाला. त्यानंतर, अजित पवारांनी स्वत:कडे हात करत, “कोण मी?” असा प्रश्न पत्रकाराला विचारला. त्यावर पत्रकाराने ‘होय, नोव्हेंबर २०१९ मध्ये’ असं उत्तर दिलं.
 
पत्रकारने थेट देवेंद्र फडणवीसांसोबतच्या पहाटेच्या शपथविधीचा संदर्भ दिल्यानंतर अजित पवारांनी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया दिली. “मी जेव्हा पहिल्यांदा शपथ घेतली होती ना, त्यानंतर मी प्रसारमाध्यमांसमोर आलोच नव्हतो,” असं अजित पवार यांनी एकदम हातवारे करुन सांगितलं. ते पाहून अजित पवारांच्या बाजूला बसलेले राष्ट्रवादीचे राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासहीत सर्वच उपस्थित पत्रकार जोरजोरात हसू लागले.