राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अजित पवार गटाच्या नेत्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.
मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांचा एक नियोजित कार्यक्रम होता. पण दरम्यान, अजित पवार गटातील नेते अचानक याठिकाणी दाखल झाले. त्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चाही केली.
यावेळी अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आदी वरीष्ठ नेते उपस्थित होते.
आपण शरद पवारांचा 'आशीर्वाद' घेण्यासाठी आलो होतो, ते आमचे दैवत आहेत, असं अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांनी म्हटलं आहे.
भेटीबाबत माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं, "शरद पवारांनी आमचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. पण त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही.
ते पुढे म्हणाले, "आम्ही सर्वजण अजित पवार यांच्या बंगल्यावर सकाळी होतो. शरद पवार हे वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये आल्याचं समजताच आम्ही त्यांना भेटण्यासाठी येथे थेट आलो."
शरद पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आलो होतो. ते आमचे दैवत आहेत. आम्ही त्यांना विनंती केली की आमच्या सगळ्यांच्या मनात त्यांच्यासाठी आदर आहे.
पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध कसा राहू शकतो, यासाठी त्यांनी योग्य विचार करावा, येणाऱ्या काळात आम्हाला मार्गदर्शन करावं, अशी विनंती आम्ही त्यांच्याकडे केली.
शरद पवारांनी फक्त आमचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं, त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
जयंत पाटील काय म्हणाले?
प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांना भेटीविषयी माहिती दिल्यानंतर काही वेळाने राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
ते म्हणाले, विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाची तयारी सुरू आहे. चहापानाचं काय करायचं याबाबत शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांसोबत बैठक सुरू होती. अचानक फोन आल्याने मी इथे आलो. त्यावेळी सत्तेत सहभागी झालेले राष्ट्रवादी काँग्रेस नेते उपस्थित होते. त्यांनी घडलेल्या घटनेबाबत दिलगिरी व्यक्त केली. यातून काहीतरी मार्ग काढा, अशी विनंती त्यांनी केली. पण त्यावर शरद पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही."
जयंत पाटील पुढे म्हणाले, "शिवसेना आणि काँग्रेससोबत आमची विरोधी पक्षनेतेपदाबाबत चर्चा झाली. आमच्यातीलच काही जण सत्तेत सहभागी झाल्याने जितेंद्र आव्हाड यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. हे पद काँग्रेसकडे जाऊ शकतं. आम्हाला 19 ते 20 आमदारांचा पाठिंबा आहे. अजित पवारांसोबत गेलेल्या सर्व आमदारांची मानसिकता आमच्या बाजूने आहे, असं पाटील यांनी म्हटलं.
Published By- Priya Dixit