सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 18 एप्रिल 2023 (08:51 IST)

अजित पवार: महाराष्ट्रात अजून एका राजकीय 'भूकंपा'ची गंभीर चर्चा सुरू आहे, कारण...

ajit pawar
"कुछ तो मजबूरीयां रही होगी, यूंही नही कोई बेवफा होता. काहीतरी अडचण असेल, कुठेतरी नस दाबली असेल, काहीतरी मजबूरी असेल, काहीतरी प्रॉब्लेम असेल. समझ लो, अब क्या करेंगे?"
 
रविवारी नागपूर इथं 'महाविकास आघाडी'च्या 'वज्रमूठ' सभेत 'राष्ट्रवादी कॉंग्रेस'चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना जाहीर भाषणात हा हे शेर ऐकवला आणि समजून घ्या असंही म्हटलं. पाटील यांचा त्याचा संदर्भ ठाकरेंचे जे सहकारी त्यांना सोडून गेले त्याच्याशी होता.
 
पण राजकारणात बऱ्याचदा जे थेट बोललं जातं त्यापेक्षा 'बिटविन द लाईन्स' अर्थ काय आहे त्याचं महत्त्व अधिक असतं.
 
आणि जेव्हा जयंत पाटील हा शेर ठाकरेंना ऐकवत होते, तेव्हा त्यांच्या शेजारी अजित पवार बसले होते. त्यामुळे साहजिकच चर्चा सुरू झाली, की पाटील नक्की कोणाला समजून घ्या असं ठाकरेंना सुचवत आहेत?
 
अजित पवार पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहेत. यापूर्वी अनेक धक्के देणारे पवार, आता पुन्हा काय करणार हा प्रश्न परत पुन्हा एकदा घिरट्या घालू लागला आहे.
 
अजित पवार पुन्हा एकदा 'राष्ट्रवादी'मधला आपला एक गट घेऊन भाजपाच्या सोबत जाणार असल्याची शक्यता महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. तिला 'राष्ट्रवादी' अथवा पवार यांच्याकडून स्पष्ट शब्दांत आणि विस्तारानं नाकारलं न गेल्यानं ती शक्यता अधिक दाट बनली आहे.
 
अजित पवार यांनी सोमवारी संध्याकाळी ट्वीट करत म्हटले की "मंगळवारी मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत, त्या पूर्णत: असत्य आहेत. मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली नाही, याची नोंद घ्यावी."
 
"सोमवारी माझा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता. मी मुंबईतच आहे. उद्या, मंगळवार दि. 18 एप्रिल 2023 रोजी मी विधानभवनातील माझ्या कार्यालयात उपस्थित राहणार असून कार्यालयाचे नियमित कामकाज सुरू राहणार आहे," असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
 
याआधी देखील त्यांनी याच प्रकारे म्हटले होते.
 
"या सगळ्या बातम्या बिनबुडाच्या आहेत. त्यात कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही. त्यामुळे कारण नसतांना गैरसमज निर्माण करण्याचं काम मीडियानं करू नये. तुम्हीच चर्चा करता आणि मी त्या चर्चेचा आनंद घेतो," असं पत्रकारांना सांगून अजित पवारांनी काल वेळ मारुन नेली. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्या, शरद पवारांच्या काही विधानांमुळे, काही राजकीय घडामोडींमुळे आणि आता आलेल्या काही बातम्यांमुळे चर्चा एकदम गरम झाली आहे.
 
2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंपांची जणू माळ लागली आहे.
 
1: उद्धव ठाकरेंनी निकालानंतर भाजपाशी मैत्री तोडली आणि 'महाविकास आघाडी' उभारली.
 
2: ती सत्तेवर येण्यापूर्वीच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा 'पहाटेचा शपथविधी' झाला.
 
3: पवार-फडणवीस सरकार केवळ 80 तास राहिलं आणि अजित पवार पुन्हा 'महाविकास आघाडी'त परतले.
 
4: एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड केलं आणि उद्धव ठाकरेंचं सरकार बनलं.
 
5: शिंदे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले.
 
काय महाराष्ट्र अजून एका राजकीय भूकंपाच्या उंबरठ्यावर आहे?
 
अजित पवार 'राष्ट्रवादी'त बंड करण्याच्या तयारीत अशी चर्चा पुन्हा का सुरू झाली?
 
एक तर अजित पवार आणि शरद पवारांच्या गेल्या काही दिवसांतल्या वक्तव्यांमुळे अनेक शंकांना पेव फुटले होते. त्यांची विधानं महाराष्ट्रात 'महाविकास आघाडी' आणि राष्ट्रीय स्तरावर भाजपाविरोधी पक्षांच्या मतांना सुसंगत नव्हती. काही तर पूर्ण विरोधात होती. तेव्हापासूनच 'राष्ट्रवादी'च्या गोटात सारं काही आलबेल नाही असं बोललं जाऊ लागलं.
 
पण रविवारी (16 एप्रिल) वर्तमानपत्रातल्या एका बातमीमुळे आणि एका लेखामुळे, त्यातल्या गौप्यस्फोटांमुळे अचानक हालचालींनी जोर धरला. या दोन्ही गौप्यस्फोटांचा रोख हाच होता की 'राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर आहे आणि अजित पवार वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
 
'न्यू इंडियन एक्स्प्रेस'या वृत्तपत्राच्या बातमीत 'राष्ट्रवादी'तल्या काही सूत्रांच्या आधारे दावा करण्यात आला आहे की: 'अजित पवार हे राष्ट्रवादीतल्या त्यांचे समर्थक असलेल्या आमदारांसोबत सध्या सत्तेत असलेल्या भाजपा आणि शिवसेना (शिंदे) यांच्या सरकारमध्ये सामिल होऊ शकतात. अजित पवार हे या सरकारमध्ये मुख्यमंत्री होऊ शकतात.
 
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर असलेली अपात्रतेची टांगती तलवार आणि उद्धव ठाकरेंचा वाढणारा प्रभाव हे पाहता भाजपानं हा निर्णय घेतला आहे. 8 एप्रिलला जेव्हा अजित पवार काही काळ संपर्काबाहेर होते तेव्हा ते दिल्लीत अमित शाहांची भेट घेऊन या निर्णयाला अंतिम स्वरुप देण्यासाठी गेले होते.
 
शरद पवारांचा भाजपासोबत जाण्याला पाठिंबा नाही आणि त्यांनी अजित पवारांना त्यांचा निर्णय घ्यावा असं म्हटलं आहे. आमदार मात्र अजित यांनी शरद पवारांचा पाठिंबा कसाही मिळवावाच असं म्हणत आहेत.'
या बातमीनं महाराष्ट्राच्या राजकीय विश्वात एकदम खळबळ उडाली. आघाडीच्या 'वज्रमूठ' सभेसाठी नागपूरला गेलेल्या अजित पवारांनी अशा बातमीत तथ्य नाही असं म्हटलं, पण त्या दिवशीच प्रकाशित झालेल्या अजून एका लेखाने अजित पवारांच्या हालचालींवर फोकस आणला होता.
 
रविवारी 'सामना'मध्ये त्यांच्या 'रोखठोक' या सदरात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठा खुलासा केला. तो शरद पवार यांच्याच नावानं केला, त्यामुळे गांभीर्य अधिक वाढलं.
 
शरद पवारांनी 'मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतांना ठाकरेंनी सर्वांशी चर्चा करायला हवी होती' असं एका मुलाखतीत म्हणून उद्धव यांच्यावरची नाराजी जाहीरपणे मांडली. त्याच दिवशी उद्धव तातडीनं राऊत यांच्यासोबत शरद पवारांना भेटायला गेले. तेव्हा सुप्रिया सुळेही हजर होत्या.
 
या लेखात राऊत अजित पवारांच्या राजकीय हालचालींविषयी लिहितात आणि या सगळ्याबद्दल त्यांनीच परखडपणे खुलासा करावा असंही म्हणतात. पण मुख्य बातमी आहे ती शरद पवारांनी याबद्दल काय म्हटलं याची.
 
संजय राऊत यांनी लिहिलं आहे : 'मंगळवारी श्री. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर श्री. शरद पवारांना भेटलो. ते म्हणाले, कोणालाही मनापासून सोडू जायचे नाही, पण कुटुंबाला टारगेट केले जात आहे. कुणालाही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न, पण 'पक्ष' म्हणून आम्ही भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेणार नाही."
 
याचा अर्थ, राऊतांच्या म्हणण्यानुसार, 'राष्ट्रवादी' पक्षा अंतर्गत काही जण भाजपासोबत जाण्याच्या विचाराचे आहेत हे शरद पवारांनीच सांगितले.
 
शरद पवार यांनी त्या अगोदर काही दिवसांपूर्वी 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, 'महाविकास आघाडीमध्ये एकत्र राहण्याची इच्छा मला आता तरी सगळ्यांमध्ये दिसते आहे. पण त्यात कोणी वेगळा निर्णय घेतला तर तो वैयक्तिक असेल, पक्षाचा नसेल."
 
या सगळ्या वक्तव्य-गौप्यस्फोटानंतरच कालपासून अजित पवारांच्या भाजपासोबत जाण्याच्या चर्चांना उधाण आलं. 'यात तथ्य नाही' असं अजित पवारांनी म्हटलं असलं तरीही ते स्पष्टपणे नाकारण्याची संधी रविवारच्या नागपूरच्या सभेत भाषणादरम्यान होती. पण अजित पवारांनी या सभेत भाषण केलं नाही.
 
शरद पवार आणि अजित पवारांची अगोदरची वक्तव्यं
सध्या महाराष्ट्रात उठलेल्या राजकीय वादळाची सुरुवात शरद पवार आणि अजित पवार यांच्या वक्तव्यांनी झाली होती.
 
उद्धव ठाकरेंनी मालेगावच्या सभेत राहुल गांधींना सावरकरांच्या मुद्द्यावरुन जाहीरपणे सुनावल्यानंतर शरद पवारांनीही दिल्लीच्या बैठकीमध्ये या मुद्द्यावर राहुल यांना सबुरीनं घेण्याचा सल्ला दिला होता. तेव्हा पवार हे ज्येष्ठत्वाच्या नात्यानं सांगत आहेत असं म्हटलं गेलं आणि राहुल यांच्याकडून ते मान्यही केलं गेलं अशा बातम्या आल्या.
 
पण त्यानंतर शरद पवारांच्या एकमामागोमाग एक भूमिकांनी वादळ निर्माण केलं. अगोदर त्यांनी गौतम अदानी प्रकरणात विरोधकांच्या 'जेपीसी'च्या भूमिकेशी सहमत नसल्याचं म्हटलं.
 
त्यानंतर नरेंद्र मोदींच्या ड्रिग्रीबद्दल कॉंग्रेस सातत्यानं प्रश्न उपस्थित करत असतांना पवारांनी त्याबद्दलही प्रतिकूलता दाखवली. नंतर 'एबीपी माझा'च्या मुलाखतीत त्यांनी उद्धव ठाकरेंनी दिलेल्या राजिनाम्याबद्दल नाराजी व्यक्त करुन नव्या चर्चेला तोंड फोडलं.
 
यामुळे शरद पवार हे मोदी आणि भाजपाला सुसंगत भूमिका घेत आहे का या प्रश्नांसोबतच ते त्यांच्या मित्रपक्षांच्या विरुद्ध भूमिका घेत आहेत का असाही आरोपवजा प्रश्न विचारला जाऊ लागला. त्यानं टिपेचा स्वर पकडल्यावर पवारांनी आपली भूमिका मवाळ करत 'मित्रपक्षांना जेपीसी हवी असेल तर विरोध करणार नाही' अशी नवी भूमिका घेतली.
 
पण दुसरीकडे अजित पवारांची वक्तव्य पाहता तेही भाजपाच्या जवळ चालले आहेत का असे प्रश्न विचारले जात होतेच. अगोदर त्यांनी नरेंद्र मोदींच्या डिग्री प्रकरणावरुन 'मोदींना लोकांनी त्यांच्या डिग्रीवरुन निवडून दिलं नाही तर त्यांच्या करिष्म्यामुळे निवडून दिलं' अशी भूमिका घेतली. तेव्हा ठाकरे आणि कॉंग्रेस दोघेही डिग्रीवरुन भाजपाला घेरत होते.
 
त्यानंतर 'ईव्हीएम'च्या मुद्द्यावर जेव्हा सगळेच विरोधी पक्ष आक्षेप घेत आहेत आणि शरद पवारांनीच जेव्हा याबाबत विरोधी पक्षांची एक बैठक काही काळापूर्वी बोलावली होती, तेव्हा अजित पवारांनी मात्र 'ईव्हिएम'मध्ये काही चूक नाही अशी भूमिका घेतली.
 
'पराभव होतो तेव्हा 'ईव्हीएम'वर आक्षेप घेतला जातो. पण पंजाबमध्ये 'आप', बंगालममध्ये 'तृणमूल' आणि राजस्थानमध्ये 'कॉंग्रेस' जिंकतात तेव्हा तिथे 'ईव्हिएम'मध्ये गडबड असते असं म्हटलं जात नाही' असं म्हणून अजित पवारांनी विरोधकांपेक्षा वेगळी भूमिका घेतली.
 
संभाजीनगरच्या सभेत त्यांनी 'महाविकास आघाडी'तर्फे भाषण केलं, पण देवेंद्र फडणवीसांबद्दल ते काहीच बोलले नाहीत असेही आक्षेप घेतले गेले.
 
त्यामुळेच या वक्तव्यांवरुनच आता ज्या राजकीय वादळाची चर्चा होते आहे ती पार्श्वभूमी तयार झाली.
 
महाराष्ट्रात ही उलथापालथ का होऊ शकेल?
या बद्दलची अनेक कारणं सांगितली जात आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय चर्चाविश्वात ती कारणं नवी नव्हेत, पण तीच या शक्य असणाऱ्या घडामोडींमागची मुख्य कारणं सांगितली आहेत.
 
त्यातलं एक म्हणजे, जो संजय राऊत यांनी सदरामध्ये दावा केला आहे आणि सगळेच विरोधी पक्ष तो आरोप करत असतात, तो म्हणजे केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईचा दबाव.
 
या दबावाचा वापर फोडाफोडीच्या राजकारणासाठी आणि आता राष्ट्रवादीच्या बाबतीत केला जातो आहे असं राऊत यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर कारखान्याचं प्रकरण असेल किंवा अन्य, याबाबत पूर्वी चौकशी झाली आहे. या कारखान्याच्या प्रकरणातील आरोपपत्रात 'ईडी'नं आरोपपत्र नुकतंच दाखल केलं, त्यात अजित पवारांचं नाव नाही. पण अशा प्रकरणांचे उल्लेख होत असतात.
 
"राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांवरही सध्या कारवाईचा बडगा उगारला गेला आहे. हसन मुश्रिफ यांची चौकशी सुरू आहे. अनिल देशमुख नुकतेच तुरुंगातून बाहेर आले आहेत, पण ते प्रकरण चालू आहे. नवाब मलिक तुरुंगात आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत काहींचं असं मत आहे की भाजपासोबत जाऊन यातून सुटका करुन घेऊ," असं राजकीय पत्रकार सुधीर सूर्यवंशी म्हणतात.
 
दुसरं कारण म्हणजे महाराष्ट्राच्या सत्तांतराचा सर्वोच्च न्यायालयात पुढच्या काही दिवसांत येऊ घातलेला निर्णय. एकनाथ शिंदे आणि काही आमदारांवर अपात्रतेची तलवार टांगती आहे. जर निर्णय त्यांच्या विरोधात गेला तर सरकारचे आकडे कमी होतील आणि इतरही अनेक प्रश्न तयार होतील. त्यामुळे अशा स्थितीत अजित पवार आणि त्यांच्यासोबतचे आमदार घेऊन नवी रणनीति भाजपा तयार करते आहे, असंही म्हटलं जातं आहे.
 
"अजून एक गोष्ट झाली ती म्हणजे सरकार आणण्यासाठी आणि शिवसेनेची ताकद कमी करण्यासाठी शिंदेंचा भाजपाला फायदा झाला, पण त्यामुळे जनमत त्यांच्या बाजूला आलं नाही. त्यांचे तसे सर्व्हे आहेत. त्यामुळे सध्या असलेल्या राजकीय रचनेचा पुढे महाराष्ट्रात काय फायदा होईल याबद्दल नकारात्मकता आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची प्रतिमा मोठी होते आहे. म्हणूनच यात काहीतरी बदल करायला हवा असं भाजपाचं मत झालं आहे. त्यासाठी मराठा समाजात एक मोठा बेस असलेला नेता त्यांना अजित पवारांच्या रूपानं हवा आहे," सूर्यवंशी पुढे सांगतात.
 
"अजित पवारांच्या बाजूनं पाहिलं तर त्यांचं मुख्यमंत्री होण्याचं जुनं स्वप्न आहे. ते पुढे कसं पूर्ण होईल हे माहित नाही आणि आताच्या परिस्थितीत ही चालून आलेली संधी आहे. दुसरं म्हणजे अजित पवारांना महाराष्ट्रातच रस आहे. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात काय होईल याचा विचार करण्यापेक्षा ते महाराष्ट्रातल्या सध्याच्या स्थितीकडे लक्ष देतील," सूर्यवंशी पुढे सांगतात.
 
अर्थात यात एक मुद्दा सगळ्यात महत्वाचा असेल तो म्हणजे शरद पवार यांची भूमिका. ते स्पष्ट किंवा अस्पष्ट भूमिका घेऊन आमदार, कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये काय संदेश देतात यावरही या नव्या राजकारणाचं प्रत्यक्षात येणं अवलंबून असेल. भाजपापुढे महाराष्ट्रात सत्ता वाचवण्यासोबतच महत्वाचा प्रश्न लोकसभा निवडणुकीचा आहे. काही दिवसांपूर्वीच्या एका सर्व्हेमध्ये 'महाविकास आघाडी'ला अधिक जागा मिळतील असं भाकित वर्तवण्यात आलं होतं. त्या पार्श्वभूमीवरही भाजपा आपले नवे डावपेच रचते आहे.
 
 
Published By- Priya Dixit