शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 8 एप्रिल 2023 (20:41 IST)

अजित पवारांचं 'नॉट रिचेबल' होणं महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरतं, कारण...

ajit pawar
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या ‘नॉट रिचेबल’ होण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. कारण ते काल (7 एप्रिल) पुन्हा एकदा गायब झाले होते.सर्व सुरक्षा बाजूला सारत अजित पवार कुठे गेले? त्यांचा फोन का बंद येत आहे? असे प्रश्न उपस्थित करत माध्यमांनीही एकच हलकल्लोळ माजवला.
अखेर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज (8 एप्रिल) अजित पवार एका उद्घाटनाच्या कार्यक्रमात हजर राहिले आणि त्यांच्या ‘नॉट रिचेबल’ होण्याच्या चर्चाही थांबल्या.
 
पण हे काही पहिल्यांदाच झालंय असं नाही आणि अजित पवार गायब झाल्यानं राजकीय उलथापालथीच्या शक्यता माध्यमं तपासून पाहतात, यालाही मागच्या काही काळातल्या घडामोडींचे संदर्भ आहेत. एकूणच अजित पवार आणि त्यांचं ‘नॉट रिचेबल’ होणं, हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं स्वतंत्र प्रकरण झालंय.
आपण या वृत्तलेखातून अजित पवार आजवर कधी कधी गायब झाले होते आणि नंतर समोर येत त्यांनी काय कारणं दिली, हे पाहणार आहेत. तसंच, अशा प्रकारामुळे वरिष्ठ राजकीय नेता म्हणून त्यांच्या प्रतिमेवर काय परिणाम होतो आणि या प्रकाराचे राजकीय अर्थ काय निघतात, हेही राजकीय विश्लेषक, राजकीय रणनितीकारांकडून जाणून घेऊ.
 
तत्पूर्वी, काल आणि आज नेमकं काय घडलं हे जाणून घेऊ.
 
काल ‘गायब’, आज ‘प्रकट’.. नेमकं घडलं काय?
काल (7 एप्रिल) अजित पवार नियोजित कार्यक्रमांना उपस्थित लावण्याच्या हेतूनं पुण्यातील बारामती हॉस्टेलला सकाळी 9 वाजता पोहोचले. तिथंच दुपारपर्यंत कात्रज दूध संघातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. त्यानंतर माध्यमांशी संवादही साधला.
 
तिथून जेवण झाल्यानंतर केशवनगर येथील कार्यक्रमासाठी रवाना झाले. नियोजित कार्यक्रमस्थळाच्या काही किलोमीटर आधी त्यांच्या वाहनांचा ताफा थांबला आणि तिथेच ते बंदोबस्त सोडून खासगी दौऱ्यावर निघून गेले.
 
केशवनगर येथील कार्यक्रमासाठी इतर सहकाऱ्यांना जाण्यास सांगितलं.
 
त्यानंतर अजित पवार ‘नॉट रिचेबल’ झाल्यानं सर्वत्र चर्चा सुरू झाली. 2019 मध्ये ‘गायब’ होत पहाटेचा शपथविधी उरकला होता. त्यामुळे यावेळी अजित पवारांच्या ‘नॉट रिचेबल’ होण्याला गांभीर्यानं घेतलं गेलं.
माध्यमांमध्ये रात्री उशिरापर्यंत अजित पवारांच्या ‘नॉट रिचेबल’ असण्यावरून तर्क-वितर्क लढवले गेले.
 
त्यानंतर आज (8 एप्रिल) सकाळी पुण्यातील खराडी परिसरातील रांका ज्वेलर्सच्या नव्या दालनाचे आज उद्घाटनाला हजर राहिले.
 
त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले, “काल काम करत असताना मला पित्ताचा त्रास होऊ लागला. जागरणं आणि दौरे जास्त झाले की मला पित्ताचा त्रास होतो. तो खूप वर्षांपासूनचा त्रास आहे. त्यानंतर मी डॉक्टरांकडून औषधं घेतली आणि झोपलो. आज बरं वाटू लागल्यानंतर सकाळपासून मी कार्यक्रम सुरू केले. परंतु याच काळात माध्यमं कसल्याही बातम्या दाखवत होती. त्या बातम्या पाहून मला वाईट वाटत होतं.
 
“मी नॉट रिचेबल आहे, अशा आशयाचा बातम्या दाखवल्या जात होत्या. हे सगळं बंद करा ना, तुम्ही आधी सत्यता तपासा, ती व्यक्ती कुठे आहे ते तपासा. कारण नसताना एखाद्याची बदनामी करायची असं सुरू आहे, पण बदनामी किती करायची याची एक मर्यादा असते. आम्ही पब्लिक फिगर असल्याने तुम्हाला आमच्या बातम्या देण्याचा अधिकार आहे. परंतु अशा प्रकारच्या बातम्या देणं बरोबर नाही, एवढंच मला म्हणायचं आहे. वर्तमान पत्रातदेखील अशा बातम्या पाहून मला वाईट वाटलं.”
 
मात्र, अजित पवारांबाबत हे काही पहिल्यांदाच घडलं नाहीय. यापूर्वीही अजित पवार असे ‘गायब’ झाल्याचे प्रसंग आहेत. आपण त्यांवर एक नजर टाकू.
 
अजित पवार कधी एक दिवस, तर कधी सात दिवस ‘नॉट रिचेबल’
गेल्यावर्षी म्हणजे 2022 च्या सप्टेंबर महिन्यात दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियमवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन होतं. या अधिवेशनाच्या अंतिम सत्रात शरद पवारांसह सर्व वरिष्ठ नेत्यांची भाषणं होती.
 
स्वत: शरद पवारांसह प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असे नेते मंचावर हजर होते. स्वत: अजित पवारसुद्धा पूर्ण वेळ मंचावर होते. अनेक नेत्यांची भाषणं झाली. सुप्रिया सुळे, जयंत पाटील असे सगळे बोललेल. पण शेवटच्या टप्प्यात शरद पवारांचं भाषण होण्याआधी अजित पवारांचं भाषण होईल असं समोर असलेल्या कार्यकर्त्यांना वाटत होतं.
 
पण अजित पवार मंचावरुन उठून खाली उतरले. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी अजित पवारांच्या नावानं घोषणा सुरु केल्या. या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओसुद्धा समोर आला आहे. कार्यक्रमाचं प्रक्षेपणही होत होतं. घोषणा सुरु झाल्यावर प्रफुल्ल पटेलांनी आपल्या हातात माईक घेत अजित पवार बोलतील असं म्हटलं पण तेव्हा अजित पवार मंचावर नव्हते.
मग ते 'वॉशरुमला गेले आहेत, आल्यावर बोलतील' असं पटेलांना सांगावं लागलं. शेवटी बराच काळ अजित पवार न आल्यानं शरद पवारांनी त्यांचं भाषण सुरु केलं. अजित पवारांचं भाषण अखेरीस झालंच नाही.
 
यानंतर अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यामुळे अजित पवारांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन नाराज नसल्याचं स्पष्टीकरण दिलं.
 
अजित पवार म्हणाले होते की, “मी वॉशरुमला गेलो तर माध्यमांनी नेहमीप्रमाणे अर्थ काढला. माझ्याबद्दल वेगवेगळ्या बातम्या दाखवल्या. अरे, मी वॉशरुमला पण जायचं नाही का?”
 
तसंच, ते पुढे म्हणाले होते की, “वेळ कमी होता आणि अनेकांची ठरलेली भाषणं झाली नाहीत. त्यामुळे मी भाषण न करण्याचं ठरवलं.”
 
या घटनेच्या काही दिवसांनीच नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं दोन दिवसीय शिबीर भरलं होतं. तेव्हाही असेच अजित पवार गायब होते आणि तेही सात दिवस.
 
शिर्डीत 4 आणि 5 नोव्हेंबर 2022 या दोन दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शिबीर होतं. या शिबिराला तर अजित पवार उपस्थित नव्हतेच. शिवाय, नंतरही काही दिवस ते गायब होते.
 
मग सात दिवसांनी ते अवतरले आणि माध्यमांसमोर येत त्यांनी आपण कुठे होतो याची माहिती दिली. त्यावेळी अजित पवार म्हणाले होते की, “मी परदेश दौऱ्यावर होतो. हा माझा नियोजित दौरा होता. त्यामुळे कारण नसताना मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. एकदातरी माझ्या ऑफिसला विचारायचं होतं, अजित पवार कुठे गेला आहे? उगीच काही बातम्या चालवायच्या?”
 
या दोन्ही घटनांपूर्वीही अजित पवार एकदा गायब झाले होते आणि त्या घटनेनं तर महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला होता. ती घटना म्हणजे ‘पहाटेच्या शपथविधी’ची.
 
पहाटेचा शपथविधी
2019 साली भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष युती करून एकत्र लढले. मात्र, सत्ता स्थापन करताना मुख्यमंत्रिपदावरून वाद सुरु झाला. सत्ता स्थापन करण्यास यामुळे उशीर होत असतानाच, राज्याज राष्ट्रपती राजवट लागू होती.
 
23 नोव्हेंबर 2019 रोजी रात्रीत सूत्र फिरली आणि राष्ट्रपती राजवट उठवण्यात आली. पहाटे एएनआय वृत्तसेवा संस्थेनं फोटो आणि बातमी प्रसिद्ध केली की, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सत्ता स्थापन करत, अनुक्रमे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
 
यानंतर शरद पवारांनी सूत्र हलवत अजित पवारांसोबत जाऊ पाहणाऱ्या समर्थक आमदारांना माघारी आणलं. मात्र, या पहाटेच्या शपथविधीच्या काही वेळ आधीपासून ते दुसऱ्या दिवशीही अजित पवार पूर्णपणे गायब होते.
 
अजित पवार यांच्या गायब होण्याच्या प्रकारानं यावेळी मात्र महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला पार हादरवून सोडलं होतं.
 
आता आपण अजित पवारांच्या अशा अचानक गायब होण्याच्या प्रकारामुळे नेमका त्यांच्या आणि राष्ट्रवादीच्या प्रतिमेवर काय परिणाम झालाय, तसंच याचे राजकीय अर्थ काय निघतात, हे आम्ही राजकीय विश्लेषक आणि राजकीय रणनितीकार यांच्याशी बातचित करून जाणून घेतलं.
 
अजित पवार सारखे असे धक्के का देतात?
ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे याबाबत म्हणतात की, “तुम्ही सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असताना अचानक गायब होण्याच्या कार्यपद्धतीमुळे एक शंकेचं वातावरण तयार होतं आणि वारंवार असं घडल्यास मग या शंकांना दुजोरा मिळतो. अजित पवारांबाबत नेमकं हेच होतंय.”
मात्र, ज्येष्ठ पत्रकार संजय जोग प्रसारमाध्यमांच्या अंगानं या घटनेचं विश्लेषण करतात.
 
संजय जोग म्हणतात की, “आजच्या इलेक्ट्रॉनिक चॅनेल, वेबसाईट्स किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सार्वजनिक क्षेत्रातल्या व्यक्ती 24 तास उपलब्ध असाव्यात, अशी अपेक्षा असते. त्यातही अजित पवारांसारख्या वरिष्ठ पातळीवरच्या नेत्याबाबत ही अपेक्षा आणखी वाढते आणि अशी व्यक्ती थोडी संपर्काच्या बाहेर गेल्यास तर्क-वितर्क लढवण्यास सुरुवात केली जाते.”
 
“एखादी व्यक्ती राजकारणात असते, तसंच तिचं वैयक्तिक आयुष्यही असतं. प्रसारमाध्यमांचा संपर्क होत नाही, म्हणजे राजकीय अर्थांचे तर्क लढवत बसणं योग्य वाटत नाही,” असंही संजय जोग म्हणतात.
 
मात्र, अभय देशपांडे याच मुद्द्यावर बोलताना म्हणतात की, “राजकीय नेते 24 तास उपलब्ध असतील, या अपेक्षेनं पाहणारी प्रसारमाध्यमं असतात, हे खरं. त्यांना ब्रेकिंग न्यूजमुळे ते करावं लागत असेलही. पण अशा काही बातम्या पुढे आल्यास तातडीनं स्पष्टकरण देणंही आवश्यक असतं, जेणेकरून अफवा किंवा संभ्रम दूर होऊ शकतील.”
 
“अजित पवारांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास, ते नॉट रिचेबल झाल्यानंतर त्यांच्या कार्यालयाकडून किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरणाचं तसं पत्रक का काढण्यात आलं नाही, जेणेकरून संभ्रमाचं वातावरण दूर होईल,” असंही अभय देशपांडे म्हणतात.
 
Published By- Priya Dixit