1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 16 ऑगस्ट 2023 (07:22 IST)

अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांच्या भेटीला ; नवाब मलिकांच्या राजकीय भूमिकेकडे राज्याचे लक्ष

ajit panwar
Ajit Pawars group leader Nawab Maliks meeting : आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते नवाब मलिक यांची अखेर १७ महिन्यांनंतर दोन महिन्यांच्या जामिनावर सुटका झाली आहे.  नवाब मलिक यांना चार दिवसांआधी जामीन मंजूर झाला आहे.  प्रकृतीच्या कारणावरुन त्यांना जामीन देण्यात आला आहे. त्यांना जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील नेत्यांनी नवाब मलिक यांची भेट घेतली आहे.
 
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल, अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, अजित पवार गटाच्या युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
 
नवाब मलिक तुरुंगात असतानाच राष्ट्रवादीत फूट पडली आहे. अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तर भाजपशी हातमिळवणी शक्य नसल्याचं शरद पवार यांनी जाहीर केलं आहे. नवाब मलिक सध्या जामीनावर आहेत. अशा परिस्थितीत नवाब मलिक यांची भूमिका काय असणार याकडे राष्ट्रवादीसह राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे.
 
प्रफुल पटेल यांनी या भेटीनंतर प्रतिक्रिया दिली आहे. नवाब मलिक यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. 16 महिन्यानंतर त्यांना जामीन मिळाला आहे. तुमच्यासोबत आहोत हे सांगण्यासाठी आम्ही आलो होतो. असं त्यांनी सांगितलं.
 
राजकीय विषयावर चर्चा केलेली नाही.  25-30 वर्षांपासून आम्ही एकत्र आहोत.  माणुसकी म्हणून, मित्र म्हणून त्यांना भेटायला आलो. ही केवळ सदिच्छा भेट होती. राजकीय भेट नव्हती . दुसरा कुठलाही अर्थ काढू नका. त्यांची प्रकृती सुधारल्याशिवाय दुसरे कुठलेही काम त्यांनी करू नये, असंच आमचं म्हणणं आहे, असं प्रफुल्ल पटेल म्हणालेत.
 
तब्बल दीड वर्षांनंतर नवाब मलिक यांना प्रकृतीच्या कारणामुळे दोन महिन्यांचा जामीन मिळाला आहे. नवाब मलिक यांना किडनीचा आजार आहे. त्यांची किडनी निकामी झाली आहे. या आजारावर उपचारांसाठी जामीनाची मागणी नवाब मलिक यांनी केली होती. ती मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली. त्यानंतर त्यांना जामीन देण्यात आला.