रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 24 सप्टेंबर 2020 (17:04 IST)

जिम सुरु करण्यासाठी परवानगी द्या, असोसिएशने केली मुख्यमंत्र्याकडे मागणी

मागील सात महिन्यांपासून जिम बंद असल्याने जिम चालक व मालकांसह शेकडो जिम कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. ही परिस्थिती दिवसागणिक अत्यंत गंभीर बनत चालली असून राज्यातील जिम सुरु करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी जिम ओनर्स वेल्फेयर असोसिएशनने केली आहे. याबाबतचे लेखी निवेदन असोसिएशनने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
 
याशिवाय पर्सनल ट्रेनिंग व काऊन्सलिंगला परवानगी द्यावी, लॉक डाऊन काळात मृत्यू पावलेल्या जिम कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे, जिम व्यवसायातील आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी सबसीडी लोन द्यावे, अशा प्रमुख मागण्यांचा समावेश जिम असोसिएशनने मुख्यमंत्रांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.
 
राज्यात मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरु झाला आणि एकूणच व्यवसाय लॉक झाले. जिम व्यवसाय बंद पडल्याने जिम मालक व चालकांसह जिम कर्मचारी आर्थिक संकटात आले. ट्रेनर, हेल्पर, स्वीपर असे शेकडो कर्मचाऱ्यांचे रोजगार थांबले. भाडे तत्वावर जिम चालविणाऱ्या जिम चालक व मालकांची तर मोठी आर्थिक कोंडी झाली. जिम व्यवसायावर अवलंबून असलेली शेकडो कुटुंबे सद्यस्थितीत रस्त्यावर आहेत. अनेक जिम कर्मचाऱ्यांचे जीव गेले. आता जगावे कसे, असा प्रश्न जिम चालक, मालक व जिम कर्मचाऱ्यांना पडला आहे.