रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 17 सप्टेंबर 2020 (16:23 IST)

मनसेकडून सरकारला सविनय कायदेभंग करण्याचा इशारा

बेस्ट बसच्या गर्दीत नाही, पण रेल्वेत कोरोना होतो का ? असा संतप्त सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला विचारला आहे. एक ट्विट करत त्यांनी राज्य सरकारला सविनय कायदेभंग करण्याचा इशारा दिला आहे.
 
बेस्ट बसमध्ये रोजचा सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असताना लोकल सेवा सुरू होत नसल्यानेच त्यांनी हा आक्रमक पवित्रा घेत सरकारला जाब विचारला आहे. दररोज एसटी आणि बेस्ट बसेससाठी लागणाऱ्या लोकांच्या लांबच लांब रांगा यामुळे मुंबईत येणाऱ्या तसेच मुंबईतून उपनगर आणि नजीकच्या परिसरात जाणाऱ्या प्रवाशांचे रोजचे हाल होत आहेत. बेस्ट बस एकीकडे खचाखच भरून धावत आहे. दुसरीकडे लोकल मात्र सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद आहेत. अशावेळी लोकल सुरू करण्यासाठी राज्य सरकारला मनसेने अल्टीमेटम दिला आहे.
 
अनेक तास रांगेत उभे राहिल्यानंतर पुन्हा लोकल ट्रेनमध्ये उभे राहण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे. त्यामध्येच बसची फ्रिक्वेन्सी पुरेशी नसल्याने बसमध्येही सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. एसटीच्या फेऱ्यादेखील अतिशय तोकड्या आहेत. जर लोकल सेवा लवकर सुरू झाली नाही तर सविनय कायदेभंग करावा लागेल असा ईशारा मनसेकडून देण्यात आला आहे.