समजा तुमच्या ऑफिसमध्ये कुणी अनोळखी व्यक्ती येऊन बसली आणि तुम्ही कुठलीही शहानिशा न करता लगबगीने HR कडे गेला की ऑफिसमध्ये कुणीतरी घुसलंय तर. अशा स्थितीत दोन गोष्टी होण्याची शक्यता आहे. की खरंच ती व्यक्ती अनोळखी असेल तर त्या व्यक्तीवर कारवाई केली जाईल, पण HR ने पाहून खात्री केली की अरे हे तर तुमच्याच सारखे एक कर्मचारी आहेत. तुमचे सहकारी आहेत एकमेकांची ओळख कशी नाही तुम्हाला तर तुमची काय अवस्था होईल.
आता याचा आणि विधिमंडळाच्या अधिवेशनाचा काय संबंध असं तुम्ही म्हणत असाल तर तुम्हाला विधिमंडळात घडलेला हा प्रसंग सांगते.
अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आज (13 मार्च) विधानपरिषदेत सभागृहात एका 'अज्ञात व्यक्ती'ने प्रवेश केला अशा आशयाचे पत्र विधानपरिषदेचे सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सभापती नीलम गोऱ्हे यांना दिलं होतं.
या पत्रात मिटकरींनी काय लिहिलं होतं याची माहिती उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली. त्या म्हणाल्या, 'सदस्य अमोल मिटकरी यांनी शुक्रवारी (10 मार्च) पत्र दिलं होतं की, सभागृहात एक व्यक्ती आली आहे. निळा शर्ट घातलेला आणि गोल टिळा लावलेला आहे. सभागृहाचे कामकाज सुरू असताना काही वेळ ही व्यक्ती बसली होती. ही व्यक्ती कोण? ही गंभीर बाब तपासून याची पडताळणी व्हावी.'
अशी विनंती मिटकरी यांनी केली होती अशी माहिती उपसभापतींनी दिली.
तर हे पत्र दिल्यानंतर काही वेळातच माध्यमांनी विधिमंडळाच्या आणि सभागृहाच्या सुरेक्षवर प्रश्न उपस्थित करत अशा पद्धतीचे पत्र आमदार सदस्याने दिले आहे का? असे वृत्त प्रकाशित केले.
तसंच काही ठिकाणी संबंधित 'अज्ञात' व्यक्तीचे फोटोही प्रसिद्ध झाल्याची माहिती सभागृहात देण्यात आली. यामुळे विधानपरिषदेच्या सभागृहात आलेली 'अज्ञात' व्यक्ती कोण होती आणि 'अज्ञाता'ने सभागृहात प्रवेश केलाच कसा? असेही प्रश्न उपस्थित करण्यात येत होते.
परंतु आश्चर्याची बाब म्हणजे ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही 'अज्ञात' नसून प्रत्यक्षात आमदार आहे आणि सभागृहाची सदस्य आहेत. त्यांचे नाव रमेश कराड आहे, हे स्वत: उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीच जाहीर केलं.
म्हणजेच 'ती' 'अज्ञात' व्यक्ती आमदार होती असं यावरून स्पष्ट झालं आणि पुन्हा नव्याने यावरून सभागृहात सत्ताधारी आमदारांनी गदारोळ घातला.
'आमदारांनीच एकमेकांशी आता एकदा ओळख करून घ्या'
सभापती नीलम गोऱ्हे यांनी अमोल मिटकरींच्या पत्राची माहिती दिल्यानंतर काही तासातच त्यांना माध्यम प्रतिनिधींचे फोन आले अशीही माहिती सभागृहात दिली.
तसंच आपण वृत्तवाहिनीवर संबंधित स्क्रोल पाहिला असल्याचंही त्या म्हणाल्या. विधिमंडळात सुरक्षेचा कसा भंग झाला अशा बातम्या सुरू झाल्या आणि असे वृत्त दाखवू नका असं आपण माध्यमांना सांगितल्याचंही नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
त्या म्हणाल्या, 'मी असं सांगितलं कारण समजा उद्या आपण गृहीत धरू की एखादा अतिरेकी आला. तर त्याचा फोटो आपण असा जाहीर करू का, त्याला मग पकडता येईल का. पण नाही आपल्या कर्तव्यदक्ष वाहिन्यांनी त्याचे फोटोही प्रकाशित केला.'
या मुद्यावरून सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक आमदार दोन्ही बाजूच्या आमदारांमध्ये चर्चेला सुरुवात झाली. सगळेच एकमेकांकडे पाहत नेमकं काय घडलं याबाबत बोलताना दिसत होते.
निळ्या रंगाचं शर्ट कोणी घातलं हे सुद्धा मला पाहावं लागत आहे, असंही नीलम गोऱ्हे पुढे म्हणाल्या. बघा आता सभापतींना काय काय काम करावं लागत आहे. कोणी कोणता शर्ट घातला हे सुद्धा आम्हीच पहायचं? असंही त्या म्हणाल्या.
पुढे सीसीटीव्ही तपासल्यानंतर आणि आपल्याही लक्षात आलं की भाजपचे आमदार रमेश कराड यांनी त्यादिवशी निळ्या रंगाचं शर्ट घातलं होतं असं सभापती नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केलं.
आता आमदार असूनही अमोल मिटकरी त्याच सभागृहात बसणाऱ्या सदस्य आमदाराला ओळखत नाहीत का? असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला.
यावरच बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, 'अमोल मिटकरींना रमेश कराड अज्ञात व्यक्ती का वाटावेत हा प्रश्न आहे. परंतु त्यांनी हे सुद्धा सांगितलं की इतर काही आमदारांनाही त्यांनी संबंधित व्यक्तीबद्दल विचारले परंतु ते आमदाराही त्यांना ओळखत नव्हते. आता आमदारांनीच एकदा एकमेकांशी ओळख करून घ्या.'
हे सांगत असतानाच नीलम गोऱ्हे यांनी विधिमंडळात कुठेही सुरक्षेचा अभाव नाही असंही स्पष्ट केलं. 'रमेश कराडच सभागृहात होते कोणी अज्ञात व्यक्ती नव्हता.' अशी माहिती त्यांनी सभागृहाला दिली.
अमोल मिटकरी यांच्याकडून अनावधानाने झालं असावं असं म्हणत सभापतींनी माध्यमांनाही यापुढे काळजी घेणं गरजेचं आहे कारण अशा वृत्तामुळे एखाद्याची नोकरी जाऊ शकते असंही त्या म्हणाल्या.
'मिटकरींनी माफी मागावी'
हे चित्र तर स्पष्ट झालं परंतु सत्ताधारी आमदारांचं समाधान झालं नाही. त्यांनी पुढे आणखी एक मुद्दा उपस्थित केला आणि सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
हे प्रकरण केवळ सुरक्षेचं नव्हतं तर मीडियाला माहिती द्यायची घाई कशासाठी असा प्रश्न सदस्य आणि भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला.
ते म्हणाले, 'प्रश्न सुरक्षा व्यवस्थेचाआहेच पण सभागृहात अशी गोष्ट झालेली नसताना मीडियाच्या माध्यमातून आगोदरच दाखवली गेली. ही घाई कशासाठी, मीडियाकडे जाण्याची घाई कशासाठी?
उद्या खरंच अतिरेकी असता तर ओपन करणार होता का तेव्हा अमोल मिटकरींनी माफी मागावी.' अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली.
अज्ञात व्यक्ती म्हणून एका गावच्या सरपंचाचा फोटो काही माध्यमांनी दाखवल्याचंही सभागृहात सांगण्यात आलं. यामुळे संबंधित सरपंचांना त्रास झाला असून त्यांना अनेक फोन आले आणि दोन दिवसांपासून ते गायब आहेत अशी माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली.
प्रसिद्धीच्या हव्यासापोटी हे केलं जातं असंही ते म्हणाले. हा मुद्दा उपस्थित करत भाजपच्या आमदारांनी अमोल मिटकरी यांनी माफी मागावी अशी तीव्र मागणी सभागृहात केली.
या मुद्यावर मिटकरींनाही बोलण्याची इच्छा व्यक्त केली. रमेश कराड यांच्याशी माझी ओळख नव्हती असंही मिटकरी यांनी सभागृहात मान्य केलं.
अमोल मिटकरी म्हणाले, 'रमेश कराड यांच्याशी माझी ओळख नव्हती. मी आजूबाजूला विचारलं सगळे म्हणाले की माझ्याही परिचयाचे नाहीत. त्यामुळे मी एका साध्या कागदावर लिहून दिलं की सदस्य आहेत का हे अवगत करावे. मला सुद्धा मीडियाचे फोन सुरू झाले. मी मीडियाला सांगितलं नाही. मी फोटोही दिले नाहीत. मला फोटो आले त्यावर मी सांगितलं की ती ही व्यक्ती नाही.
मी 2000 पासून महाराष्ट्रात फिरतोय. मला टिआरपीची काय गरज आहे.'
'तरीही मी यापुढे काळजी घेईन,' असंही मिटकरी यांनी सांगितलं.
'विधिमंडळाचे पास पुन्हा सुरू करा'
या प्रकरणामुळे विधिमंडळात प्रवेशासाठी दिले जाणारे काही अतिरिक्त पासेस सोमवारी (13 मार्च) बंद करण्यात आले असा मुद्दा शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी मांडला.
ते म्हणाले, 'यासाठी पास बंद केले असंही ऐकलं आम्ही. माझी विनंती आहे की विधिमंडळाच्या परिसरात तुम्ही सुप्रिम आहात. पास सुरू राहिले पाहिजेत ही मागणी मी करतो.'
विधिमंडळाच्या बैठकीत मर्यादित पास द्यायचे असं ठरलं होतं, पास जास्त दिले जात आहेत अशी तक्रार आहे अशी माहिती नीलम गोऱ्हे यांनी दिली.
तसंच महाराष्ट्रातल्या लोकांचे प्रश्न असतात त्यामुळे अगदीच सरसकट बंद करणंही योग्य नाही असंही त्या म्हणाल्या.
आमदारांनीच पाससाठी शिफारस करताना काळजी घ्यावी अशीही सूचना त्यांनी केली.
दरम्यान, या प्रकरणामुळे एक मुद्दा प्रामुख्याने चर्चेत आला तो म्हणजे आमदारच आमदारांना ओळखत नाही का? एखादा आमदार सदस्य दुसऱ्या आमदाराला अज्ञात व्यक्ती कसा काय वाटू शकतो? आणि याचीच चर्चा पुन्हा पत्रकारांमध्ये रंगली.
Published By- Priya Dixit