शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 फेब्रुवारी 2022 (21:52 IST)

कौतुक : पोलिसांच्या समयसुचकतेने राजस्थानमधील अल्पवयीन बालिका सुखरूप

अभ्यास करीत नाही म्हणून वडील रागावतील या भीतीपोटी घरातून पळ काढणाऱ्या राजस्थानमधील अल्पवयीन मुलीला नाशिकरोड लोहमार्ग पोलिसांनी ओढा रेल्वे स्थानकातून सुखरूप ताब्यात घेतले. पिडीतेला पालकांच्या स्वाधीन केल्यानंतर तिला सुखरूप पाहून पालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.याबाबत अधिक माहिती अशी की, दि. २३ फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास ओढा रेल्वेस्थानकाचे प्रबंधक यांनी नाशिकरोड लोहमार्ग पोलिसांना कळवले की, एक अल्पवयीन मुलगी रेल्वेस्थानकांत भटकत आहे.
 
घटनेची माहिती घेत लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी शेंडगे यांनी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष कुलकर्णी समवेत पोलीस हवालदार शैलेश पाटील, चंद्रभान उबाळे, चाईल्ड लाईनच्या रेखा शिंदे, हेमांशू वनिस आदींना ओढा रेल्वे स्थानक येथे पोहचण्याचे आदेश दिले. निर्मनुष्य असलेल्या स्थानकात पोहचलेल्या पथकाने अल्पवयीन मुलीचा शोध घेणे सुरू केले. काही वेळातच एक चौदा पंधरा वर्षीय मुलगी पथकाला मिळून आली. त्यांनी तिची आस्थेने विचारपूस केली. मात्र ती वेडी असल्याचे सोंग आणून काहीही सांगण्यास नकार देत होती. तर अनेकदा चुकीची माहिती देत होती.तिला ताब्यात घेऊन नाशिकरोड लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आले. 
 
सहायक पोलिस उपनिरीक्षक कुलकर्णी यांनी तिला विश्वासात घेऊन चौकशी केली असता तिने तिचे नाव अनामिकाराज गिरीराज प्रसाद मीना (वय १४) असल्याचे सांगून राजस्थानमधील चाकसू येथीलअसल्याचे सांगितले. वडील गिरीराज प्रसाद मीना हे अभ्यास करण्यासाठी आग्रह करतात. नाही केला तर चिडतात म्हणून घर सोडून आल्याचे सांगितले. हे ऐकून सहायक पोलिस उपनिरीक्षक कुलकर्णी यांनी तत्काळ राजस्थान पोलिसांशी संपर्क करून त्याना माहिती दिली. पिडीत मुलीची आई सीतीदेवी मीना, वडील गिरीराज प्रसाद मीना यांना मुलगी सापडल्याची माहिती दिली.
 
पालकांना माहिती मिळताच त्यांनी चाकसू पोलिसांसह विमानाने मुंबई व नंतर नाशिकरोड लोहमार्ग पोलिस ठाणे गाठले. सुखरूप असलेल्या मुलीला पाहून आई वडिलांनी मिठी मारली. यावेळी त्यांना आनंदाश्रू अनावर झाले. तेव्हा उपस्थितीतांच्याही डोळ्याच्या कडा पाणवल्या. मीना कुटूंबियांनी नाशिकरोड लोहमार्ग पोलिसांचे आभार व्यक्त केले.या कामगिरीत पोलिस हवालदार दीपक निकम, संतोष उफाडे पाटील, विजय कपिले, इमरान कुरेशी आदीनी सहभाग घेतला.पोलिस अधीक्षक औरंगाबाद यांनी लोहमार्ग पोलिसांचे कौतुक केले.