शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 16 नोव्हेंबर 2022 (21:45 IST)

ठाणे जिल्ह्यात गोवरचे दीड महिन्यात अंदाजे ५२ रुग्ण बाधित

measles
ठाणे जिल्ह्यात गोवर या साथीच्या आजाराने हातपाय पसरले आहेत. गेल्या दीड महिन्यात अंदाजे ५२ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.  सर्वाधिक रुग्ण भिवंडी शहरात ३७ आढळून आले आहे. ठाणे शहरात-१०, ठाणे ग्रामीण – २ तर उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या पालिका क्षेत्रात एकही संशयित तसेच बाधीत रुग्ण आढळून आलेले आहेत.
 
ठाणे महापालिका क्षेत्रातील मुंब्रा-कौसा आणि भिवंडी महापालिका क्षेत्र या मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये रुग्ण आढळण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे अशा याठिकाणी गोवर रुबेला लसीकरणावर विशेष भर देण्यात येत आहे. तसेच सामाजिक संस्था आणि धर्मगुरु मौलाना यांच्या माध्यमातून लसीकरणाविषयी जनजागृती करण्यात येत आहे.
 
ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात आक्टोबर महिन्यात १० गोवरचे आणि पाच रुबेला गोवरचे रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांमध्ये एक वर्षाच्या आतील चार, १ ते ५ वर्षापर्यंत १३ आणि उर्वरित ११ रुग्ण पाच वर्षांच्या पुढील आहेत. २८ पैकी ७ रुग्णांनी प्रतिबंधित लशीच्या दोन मात्रा तर ३ रुग्णांनी प्रतिबंधित लशीची एक घेतली आहे. १८ रुग्णांनी एकही मात्रा घेतलेली नाही. २८ पैकी बहुतांश रुग्ण हे मुंब्रा-कौसा भागातील असल्याची बाब पालिकेच्या निदर्शनास आली आहे.
 
नोव्हेंबर महिन्यात पाच संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने मुंबई येथील हाफकीन रिसर्च इन्स्टीट्यूट येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्याचे अहवाल अद्याप आलेले नाहीत. याच कालावधीत भिवंडीत ३७ रुग्ण हे गोवर रुबेला बाधीत असल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे. तर उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या पालिका क्षेत्रात एकही संशयित तसेच बाधीत रुग्ण आढळून आलेला नसल्याचा दावा संबंधित पालिकेच्या आरोग्य विभागांनी केला आहे.