शुक्रवार, 5 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 25 जुलै 2021 (15:30 IST)

लष्कराचे ऑपरेशन वर्षा;पूरग्रस्त भागातून नागरिकांना सुरक्षित स्थानी हलविले

Army operation evacuates civilians from flood-hit areas Maharashtra News Regional Marathi News In Marathi Webdunia Marathi
भारतीय लष्कर महाराष्ट्रात पूरग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्य करण्यासाठी सज्ज झाले असून त्यात अडकलेल्या लोकांना वाचविण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरु आहे.पूरग्रस्त भाग सांगली,कोल्हापूर,रत्नागिरी आणि इतर ठिकाणी अडकलेल्या नागरिकांची सुटका करून त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
 
अतिवृष्टी आणि विविध नद्यांची पातळी वाढल्यामुळे रत्नागिरी,कोल्हापूर,सांगली व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील अनेक भाग पाण्याखाली आले.नागरी प्रशासनाच्या विनंतीवरून दक्षिणेकडील कमांडने पूरग्रस्त भागातील स्थानिकांना मदत करण्यासाठी मदत आणि बचाव पथक तैनात केले आहेत. 
 
24 जुलै 2021 रोजी औंध लष्करी तळ आणि बॉम्बे अभियांत्रिकी समूह, पुणे येथील एकूण 15 बचाव आणि मदत दल सांगली,पलूस, बुर्ली आणि चिपळूण येथे पूर मदत आणि बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. 
 
ही पथके पुराच्या भागात अडकलेल्या स्थानिक ग्रामस्थांच्या बचावासाठी आणि या पूरग्रस्त भागात सामान्य स्थिती येई पर्यन्त मदत करण्यात गुंतलेले आहेत.पूरग्रस्त भागातून 100 हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
 
भारतीय सैन्य देखील गावकऱ्यांना टँकरमधून अन्न आणि पिण्याचे पाणी पुरवित आहे. वैद्यकीय शिबिरे देखील स्थापन केली गेली आहेत ज्यात पूरग्रस्त भागातून बाहेर काढण्यात येणाऱ्या स्थानिकांना आवश्यक ते प्राथमिक उपचार आणि औषधे पुरविण्यासाठी सैन्य डॉक्टर आणि नर्सिंग सहाय्यकांची वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत. लष्कराने आपल्या तैनात केलेल्या अभियांत्रिकी प्रयत्नांनी रत्नागिरी जिल्ह्यातील पोसरे बुद्रुक गावात मुख्य दरड कोसळल्यामुळे बंद पडलेला रस्ता खुला केला आहे.
 
 सध्या सुरू असलेल्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी लष्कराने पुणे स्थित मुख्यालय दक्षिणी कमांड येथे फ्लड रिलीफ ऑपरेशन वॉर रूमची स्थापना केली आहे. अतिरिक्त 10 मदत पथक कोणत्याही आपत्कालीन परिस्थितिसाठी सतर्क ठेवण्यात आले आहे