मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 ऑगस्ट 2022 (15:46 IST)

रस्ता नसल्याने घरातच प्रसूती, जुळ्यांचा मृत्यू

Twin Baby
ठाणे जिल्ह्यात मोखाडा तालुक्यातील मरकटवाडीला रस्ता नसल्याने, एका गरोदर महिलेची घरातच प्रसूती करण्याची वेळ आली आहे. तिने जुळ्या बाळांना जन्म दिला. मात्र, वैद्यकीय उपचारांअभावी तिला आपली दोन्ही मुले गमवावी लागली आहेत. तसेच, मातेचीही प्रकृती गंभीर असून तिला 3 किलोमीटर डोंगर कपारीतून भरपावसात मुख्य रस्त्यावर आणले. तेथून तिला खोडाळा उपकेंद्रात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर उपचार सुरू आहे.
 
मरकटवाडी येथील वंदना यशवंत बुधर ही महिला सात महिन्याची गरोदर होती, तिला अचानक शनिवारी प्रसूतीच्या कळा येऊ लागल्या, कुटुंबीयांनी तत्काळ आशा सेविकेला संपर्क केला, आशा सेविकाही महिलेच्या घरी पोहोचली, तिने 108 एमबुलन्स सुद्धा बोलावली. मात्र मुख्य रस्ता ते मर्कटवाडी गावात जाण्यासाठी रस्ता नव्हता. दरम्यान महिलेला खूपच वेदना होत होत्या, तिची प्रसूती घरातच झाली. तिने जुळ्या बालकांना जन्मही दिला मात्र सात महिन्याची प्रसूती असल्याने बालक कमकुवत होते, त्यांना रुग्णालयात तत्काळ दाखल करणे आवश्यक होते. पंरतु, काही वेळातच उपचारा अभावी दोन्ही बालकांनी प्राण सोडला.

दरम्यान रक्तस्राव झाल्यामुळे महिलेची प्रकृती खालावत होती, तिला गावकऱ्यांनी झोळी करून डोंगर दऱ्या कपारीतून थेट 3 किमी अंतर पार करत मुख्य रस्त्यावर आणले. तेथून तिला एमबुलन्सद्वारे खोडाळा उपकेंद्रात दाखल करण्यात आले, तिच्यावर उपचार सुरू आहेत.