सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 ऑगस्ट 2022 (15:22 IST)

विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी उपस्थित केले 'हे' प्रश्न

vinayak mete
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती निधनावर  विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनीही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी आता विनायक मेटे यांचा चालक एकनाथ कदम  यांच्यावरही प्रश्न उभे केले आहेत. अपघात नेमका कोठे झाला, ही गोष्ट चालक सांगू शकत नव्हता. त्यामुळे ही बाब खटकणारी असल्याचं वक्तव्य विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी केलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.
 
ज्योती मेटे म्हणाल्या की, आमच्या गाडीवर काम करणाऱ्या प्रत्येक चालकाला महाराष्ट्राच्या रस्त्यांची खडानखडा माहिती असते. एकनाथ कदम आमच्याकडे गेल्या वर्षांपासून कामाला आहेत. त्यामुळे मेटेंचा अपघात नेमका कोठे झाला हे सांगता न येणं ही खटकणारी बाब आहे. मी गाडीच्या चालकाशी बोलले पण अपघात कुठे झाला हे त्याला सांगता येत नव्हतं. बीड ते मुंबई मार्गावर तो नियमित गाडी चालवतो. आमच्या सर्व चालकांना महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील रस्त्यांची इत्थंभूत माहिती असते. त्यामुळे अपघाताचे स्थळ आणि वेळ हे कळू न शकणं ही खटकणारी बाब आहे, असं ज्योती मेटे म्हणाल्या.
 
विनायक मेटे यांच्या मृत्यूची जी वेळ सांगितली जातेय, त्याआधीच त्यांचा मृत्यू झालाय हे मला त्यांची नाडी तपासताच समजलं. मी एक डॉक्टर आहे, त्यामुळे मला हे समजू शकतं. म्हणून, सत्य दडवलं जातंय, असा मला संशय आहे. विनायक मेटे यांचा अपघात आणि त्यांचा मृत्यू यामध्ये एक दुवा आहे, जो सध्या गायब आहे. याप्रकरणात काहीतरी कच्चे दुवे आहेत, काहीतरी लपवण्याचा प्रयत्न होतोय, असंही ज्योती मेटे म्हणाल्या.