सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 23 मे 2022 (14:10 IST)

औरंगाबाद एकतर्फी प्रेम प्रकरण: 'तू माझ्यावर प्रेम का करत नाही, असं म्हणत त्यानं माझ्या बहिणीचा गळा चिरला'

murder
औरंगाबाद शहरात शनिवारी भरदिवसा एका तरुणीची हत्या करण्यात आली आहे. मारेकऱ्यानं या तरुणीला 200 फूट ओढत नेऊन नंतर तिचा गळा चिरल्याचं समोर आलंय.
 
औरंगाबादमधील देवगिरी महाविद्यालयाच्या परिसरात ही घटना घडली आहे. पोलिसांनी या घटनेतील आरोपी तरुणाला अटक केली आहे. नाशिकच्या लासलगाव इथून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.
 
एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
 
वेदांतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, "या प्रकरणातील आरोपीला नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव हद्दीतून काल पकडण्यात आलं आहे. आज आम्ही त्याला कोर्टात हजर करणार आहोत. त्यानंतर मग पुढची माहिती कळेल. पण, सध्या तरी एकतर्फी प्रेमातून हे प्रकरण घडल्याचं दिसत आहे."
 
कशिशच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी औरंगाबादमध्ये कॅंडल मार्च काढण्यात आला होता.
 
प्रकरण काय?
सुखप्रीत कौर उर्फ कशिश प्रीतपाल ग्रंथी ही 18 वर्षांची तरुणी देवगिरी महाविद्यालयात बीबीएच्या प्रथम वर्षात शिकत होती.
 
शरणसिंग सेठी (20) हा एकतर्फी प्रेमातून अनेक दिवस कशिशचा पाठलाग करत होता. ही गोष्ट कशिशच्या कुटुंबीयांना समजल्यानंतर त्यांनी शरणसिंगची समजूत काढली होती. तरीही त्याने कशिशचा पिच्छा करणं सोडलं नाही.
 
अशातच शनिवारी सकाळी कशिश तिच्या मैत्रिणीसोबत महाविद्यालयात आली. तेव्हा शरणसिंगने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दुपारच्या वेळी कशीश तिच्या मैत्रिणीसोबत एका कॉफीच्या दुकानात गेली, तेव्हा शरणसिंगही तिचा पाठलाग करत तिथं आला.
 
तेव्हा दोघांमधील वाद विकोपाला गेला आणि मग शरणसिंग तिला फरफटत शेजारच्या रिकाम्या प्लॉटच्या दिशेनं घेऊन गेला. तिथं त्याने कशीशच्या मानेवर धारदार हत्यारानं वार केले आणि तो तिथून पळून गेला.
 
एफआयआरमध्ये काय?
याप्रकरणी कशिशचा भाऊ हरप्रीत सिंग यांनी वेदांत नगर पोलीस स्थानकात एफआयआर नोंदवली आहे.
 
त्यात म्हटलंय की, '21 तारखेला दुपारी 2 वाजता कशिशच्या मैत्रिणीनं फोन करून कळवलं की, शरणसिंग सेठीनं धारदार हत्यारानं कशिशच्या गळ्यावर वार केले असून ती रक्तबंबाळ अवस्थेत पडली आहे. मी तिथं पोहोचलो तेव्हा माझी बहीण रक्तबंबाळ अवस्थेत पडली होती आणि तिच्या गळ्यातून प्रचंड रक्त बाहेर येत होतं.'
 
यानंतर हरप्रीत हे आपल्या बहिणीला कशिशला सिटी केअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन गेले. पण, उपचारादरम्यान ती मृत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
 
हरप्रीत यांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये पुढे म्हटलंय की, 'माझी बहीण कॉलेजला जात येत असताना शरणसिंग सेठी नेहमी तिचा पाठलाग करायचा आणि तिला त्रास द्यायचा. तसंच तू माझ्यावर प्रेम कर, असं म्हणून त्रास देत असल्याचं माझ्या बहिणीनं मला पाच ते सहा महिन्यांपूर्वी सांगितलं होतं. त्यानंतर माझ्या चुलतभावानं त्याला समजावून सांगितलं होतं. पण, तरीही 21 मे रोजी तू माझ्यावर प्रेम का करत नाही, या कारणास्तव तिच्या गळ्यावर शस्त्रानं वार करून तिला जीवे मारले आहे.'
 
गुन्हेगारीच्या वाढत्या घटना थांबवायच्या कशा?
औरंगाबाद शहरात गेली काही दिवस मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीच्या घटना घडत आहे. कशीशच्या हत्येच्या दोन दिवस आधी एकाने मैत्रिणीची हत्या करून स्वतः आत्महत्या केली होती.
 
एकतर्फी प्रेमातून या हत्या घडल्याचं समोर येत आहे.
 
पण, मग या घटना का वाढत आहेत, असा प्रश्न पडतो. या प्रश्नाचं उत्तर देताना औरंगाबादमधील सामाजिक कार्यकर्त्या मंगला खिवंसरा सांगतात, "मूळात मुलीनं घरच्यांच्या इच्छेविरोधात प्रेम करायला आपल्याकडे विरोध आहे. त्याबाबत घरात एकदम कडक वातावरण असतं. पण, मग या वातावरणामुळे मुलीला मोकळीक मिळत नाही. त्यामुळे मग कॉलेजात तिला मित्र-मैत्रिणी भेटतात. त्यांच्यासोबत गोष्टी शेयर करता येतात आणि मग प्रेम होतं. त्यानंतर होणाऱ्या भेटीगाठी तिला लपूनछपून कराव्या लागतात.
 
"दुसरीकडे मुलालाही माहिती असतं की आपण कसंही वागलो तर ती काही घरी ते सांगू शकणार नाही. त्यामुळे मग आपण काहीही करू शकतो अशी मुलाची मानसिकता तयार होते आणि मग त्यातून बाईचा मृत्यू अशाप्रकारे अटळ असतो."
 
पण, मग हे थांबवायचं कसं, असं विचारल्यावर मंगला खिवंसरा सांगतात, "हे थांबवण्यासाठी आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. मुला-मुलीत प्रेम असेल तर कुटुंबीयांनी ते समजून घ्यायला हवं. त्या दोघांशी संवाद साधायला हवा. त्यातल्या त्रुटी सांगायला हव्यात. सगळं ठीक असेल तर त्यांना पुढे जायला सांगायला हवं."