गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 23 ऑक्टोबर 2023 (16:51 IST)

बीड : जमिनीच्या वादातून आदिवासी महिलेवर अत्याचार, मारहाण; आमदार सुरेश धसांच्या पत्नीविरोधात गुन्हा

rape
मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात जमिनीच्या वादावरून शारीरिक छळ केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
 
या प्रकरणी आमदार सुरेश धस यांची पत्नी प्राजक्ता आणि अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
ही महिला पारधी समाजातील असून प्राजक्ता धस आणि अन्य दोघांवर तिला निर्वस्त्र करून मारपीट केल्याचा आरोप केला आहे.
 
याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात प्राजक्ता धस, राहुल जगदाळे आणि रघू पवार यांच्याविरुद्ध IPCच्या 354, 354B, 323, 504, 506, 354A, 34 आणि अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
नेमकं प्रकरण काय?
पीडित आदिवासी महिलेने या संपूर्ण प्रकाराची माहिती दिली.
 
त्यांनी म्हटलं की, “मी माझ्या शेतात काम करत होतो. गाडीत मका भरत होते. तेवढ्यात रघू आला. त्याने मला एका खड्ड्यात पाडलं. खड्ड्यात पाडल्याबरोबर राहुल आला आणि त्याने माझे पाय धरले. त्यांनी माझ्यावर अत्याचार करायला सुरुवात केली.
 
माझ्या शरीराला जखमा केल्या. मला मारलं तेव्हा ती प्राजक्ता ताईंनी म्हटलं की, चांगलं ठोका, पारधी असून आपल्या रानात येऊन आपल्याला धमकी असं बोलायला लागली.”
 
“मी आरडाओरडा करायला लागल्यावर माझे पती तिथे धावधावत आले. माझ्या सुनांनी आरडाओरडा केला. माझ्या पतीला पाहून रघू पळत सुटला.त्यांच्या मागे मी पळाले. राहुल मक्याच्या शेतात पळाला आणि मॅडम (प्राजक्ता धस)ही पळाल्या. त्यानंतर पोलीस आले तेव्हा ती मक्याच्या शेतातून बाहेर आली.”
 
“थोड्यावेळाने पोलीस आले. तेव्हा ती अनेक गावगुंडांना घेऊन आली. मक्याच्या शेतातून बाहेर येत म्हणाली, ही आमची जमीन आहे. यायचं नाही. आम्ही तीन पिढ्यांपासून ही जमीन कसतो आहे असं आम्ही तिला सांगण्याचा प्रयत्न केला.
 
करार पावती दाखवली, तरी तिने माझा छळ केला. राहुल आणि रघू ती जसं सांगते तसं करतात. त्यांनी माझ्यावर जबरदस्ती केली.”
 
सुरेश धस यांची प्रतिक्रिया
भाजप आमदार सुरेश धस यांनी हा सगळा प्रकार खोटा असल्याचं सांगितलं आहे.
 
त्यांनी म्हटलं, “हा काहीही प्रकार दाखवला आहे. मी स्वत:च पोलिसांना याची फॉरेन्सिक चौकशी करण्याची विनंती केली आहे. मी 25 वर्षांपासून राजकारणात आहे.
 
मी आदिवासी आणि दलित लोकांशी कसा वागतो याची सगळ्यांना माहिती आहे. यामागचे बोलविते धनी वेगळेच आहे. त्यामुळे पोलिसांनी चौकशी करून सगळा प्रकार लोकांसमोर आणावा अशी मी मागणी करतो.”
 
बीड पोलीस यासंबंधी अधिक तपास करत आहेत.
 
या प्रकरणावरून आता राजकारणही तापू लागलं आहे.
 
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
 
त्या म्हणतात, “बीडमध्ये जमिनीच्या वादातून महिलेचा विनयभंग करत निर्वस्त्र करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. घटना कळताच मी स्वतः पोलीस अधीक्षक बीड यांच्याशी दूरध्वनीवरून माहिती घेतली.अतिशय संतापजनक अशा या घटनेत रघु पवार, राहुल जगदाळे, प्राजक्ता सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पुढील कारवाई तातडीने करावी असे निर्देश दिले आहेत. महिलेला न्याय मिळेपर्यंत आयोग याचा पाठपुरावा करेल.”
 
आष्टी विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिजित धाराशिवकर हे सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
 
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, ‘’या प्रकरणाविषयी 3 दिवसांपूर्वी फिर्याद दाखल झाली आहे. त्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या पुढील तपास चालू आहे. तपासाअंती पुढची कारवाई पार पडेल.’’