शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2022 (07:38 IST)

अध्यक्षपदी निवड केलेली असल्याने पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह आम्हालाच मिळाले पाहिजे

shinde
लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी, तसेच अध्यक्षपदी निवड केलेली असल्याने पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह आम्हालाच मिळाले पाहिजे’’ असा अर्ज शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे केला आहे. उद्धव ठाकरे गटाकडे पुरेसे समर्थन नसतानाही हा गट बेकायदेशीरपणे अंधेरी पोटनिवडणुकीत धनुष्यबाण चिन्ह वापरण्याची शक्यता असल्याने या अर्जावर तातडीने निर्णय घेण्याची विनंती शिंदे गटाने केली आहे.
 
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली असून, शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल. निवडणूक अर्ज दाखल करण्याची मुदत ही १४ ऑक्टोबपर्यंत आहे. ‘‘शिवसेनेच्या ५५ पैकी ४० आमदार, १८ पैकी १२ खासदारांचा आम्हाला पाठिंबा आहे. तसेच प्रतिनिधी सभा आणि राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचे ‘मुख्य नेता’ तसेच अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. १४४ पक्षाचे पदाधिकारी आणि ११ राज्यांच्या प्रमुखांनी शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. शिवसेनेचे बहुसंख्य लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांचा शिंदे यांना पाठिंबा आहे’’, असे या अर्जात नमूद करण्यात आले आहे. या दाव्याच्या पुष्टर्थ प्रतिज्ञापत्र तसेच अन्य कागदपत्रे दाखल करण्यात आली आहेत. तसेच अजूनही पुरावे तसेच कागदपत्रे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे शिंदे यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या पत्रात नमूद केले आहे. ‘‘उद्धव ठाकरे गट हा पक्षाच्या लोकप्रतिनिधी अथवा पदाधिकाऱ्यांच्या पाठिंब्याचे पत्र वा प्रतिज्ञापत्र सादर करू शकलेला नाही’’, असा दावाही शिंदे गटाने केला आहे.  सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक चिन्हाबाबत निर्णय घेण्यास निवडणूक आयोगाला परवानगी दिली आहे. ठाकरे गटाला पक्षाचे पुरेसे समर्थन नसतानाही धनुष्यबाण हे चिन्ह ३ नोव्हेंबरला होणाऱ्या अंधेरी पोटनिवडणुकीत वापरण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंधेरी पोटनिवडणूक लक्षात घेता धनुष्यबाण या चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने तातडीने सुनावणी घेऊन धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला द्यावे, अशी विनंती या गटाने निवडणूक आयोगाला केली आहे. शिंदे गटाच्या अर्जानुसार येत्या तीन-चार दिवसांत निवडणूक आयोग सुनावणी घेण्याची शक्यता आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor