1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

अभिनेते दिलीपकुमारांना न्याय नाही : सर्वसामान्यांनी काय अपेक्षा करावी : भुजबळांची सरकारवर टीका

maharashtra news
मुंबई :सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते पद्मविभूषित दिलीप कुमार आणि त्यांची पत्नी सायरा बानो यांचा बंगला मुंबईतील भूमाफियाकडून बळकावण्याचा प्रयत्न केला जात असल्यामुळे त्यांनी दिलीप कुमार यांच्या अकाऊंट वरून प्रधानमंत्र्याकडे ट्वीट करून या अन्यायाबाबत दाद मागितली आहे. दिलीप कुमार आणि सायरा बानो हे हिंदी चित्रपट क्षेत्रातील अतिशय नामांकित आणि आदरणीय तसेच वयोवृद्ध व्यक्तिमत्व आहे. मुंबईतील भूमाफियाकडून होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांनी यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे तक्रार केल्याचा त्यांनी ट्वीटमध्ये उल्लेख केला आहे.
 
परंतु त्यांच्या तक्रारीची दखल घेतली न गेल्यामुळे त्यांना थेट पंतप्रधानांकडे दाद मागावी लागली ही अतिशय दुर्देवी गोष्ट आहे. यावरून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती किती खालावली आहे हे दिसून येते. सुप्रसिद्ध व्यक्तींच्या मुलभूत अधिकारांवर जर अशा प्रकारे गदा येत असेल तर राज्यातील सर्वसामान्य जनतेने सरकारकडून काय अपेक्षा करावी ? अशी टीका माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सरकारवर केली आहे.