भुजबळ यांच्या सभेला तब्बल 7 कोटी रुपये खर्च, एवढे पैसे आले कुठून? धस यांचा सवाल
भाजपाचे आमदार सुरेश धस हिवाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी विधान परिषदेत मराठा आरक्षणावर सुरू असलेल्लया चर्चेत बोलताना सुरेश धस यांनी छगन भुजबळ यांना थेट सवाल विचारले आहेत.
सुरेश धस म्हणाले की, अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे यांची सभा 21 लाखात झाली, पण जालना येथील छगन भुजबळ यांच्या सभेला तब्बल 7 कोटी रुपये खर्च करण्यात आला. एवढे पैसे आले कुठून? याचं उत्तर छगन भुजबळ यांनी द्यावं, अशी मागणी सुरेश धस यांनी दिली आहे. तसेच अंतरवाली सराटी येथील सभेला मराठ समाज स्वतःहून हजर झाला होता. त्यांनी कोणीही पैसे दिले नाहीत. स्वखर्चाने ते सगळे सभेसाठी आले होते, अशी माहिती सुरेश धस यांनी दिली.
बीड येथील ओबीसी नेत्यांवरील हल्ल्यावर बोलताना सुरेश धस म्हणाले की, छगन भुजबळ यांचा बीड येथील पूर्व नियोजित ओबीसी नेत्यांवर हल्ल्याबाबतचा दावा चुकीचा आहे. कारण त्याठिकाणी केवळ ओबीसी समाजातील नेत्यांवर हल्ले झाले नाहीत, तर मराठा समाजातील नेत्यांवर देखील हल्ले झाले आहेत.
बीड हल्ल्याचा कोणीही मास्टर माईंड नाही. मराठा आरक्षणासंदर्भात राज्यकर्त्ये आपली भूमिका मांडत नाहीत, त्यामुळे पोलीस भरतीसाठी प्रयत्न करून थकलेल्या आणि क्लासेसमध्ये जाणाऱ्या 16 ते 21 वयोगटातील तरुणांनी एकत्र येत हल्ला केला. या हल्ल्यामध्ये केवळ ओबीसी नेत्यांचे कार्यालय नाही तर मराठा असलेले भाजपा, दोन्ही शिवसेना आणि बीआरएसच्या नेत्यांचे कार्यालय देखील तरुणांनी लक्ष केले, असा दावा सुरेश धस यांनी केला आहे.