तारेतारका, खेळाडू ऑनलाइन गेमिंगची जाहिराती करू नये : फडणवीस
ऑनलाइन गेमिंग अर्थात जुगाराच्या सततच्या जाहिरातीमुळे खेळण्याचा मोह होऊन त्याची सवय जडते. त्यामुळे ऑनलाइन गेमिंगच्या जाहिराती करणाऱ्या व्यक्तींनी अशा जाहिराती करू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेवरील चर्चेच्या उत्तरात केले. अशा जाहिरातींवर नियंत्रण आणणे शक्य आहे किंवा कसे हे तपासून पाहिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत महादेव अॅपच्या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी झालेल्या चर्चेत सहभागी होताना अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी ऑनलाइन गेमिंगच्या जाहिरातींची तक्रार केली. चित्रपट सृष्टीतील तारेतारका, खेळाडू ऑनलाइन गेमिंगची जाहिराती करतात. त्याचा समाजावर दुष्परिणाम होत असल्याने या जाहिराती रोखण्यात याव्यात, अशी मागणी कडू यांनी केली. काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांनीही समाजातील प्रथितयश लोक टेलिव्हिजनवर जाहिराती करून जुगाराला प्रोत्साहन देत असल्याची तक्रार केली.
या प्रश्नांना देताना फडणवीस यांनी ऑनलाइन गेमिंगची कार्यपद्धती सभागृहाला सांगितली. प्रत्यक्षातील जुगार आता ऑनलाइनवर आला आहे. त्यासाठीचे अॅप दुबईहून नियंत्रित केले जातात. ऑनलाइन गेम खेळताना आयडी क्रमांक दिला जातो. त्यानंतर अनेकजण वेगवेगळ्या माध्यमातून चार बँकांमध्ये खाती काढतात आणि वेगवेगळे खेळाडू बनून ते खेळ खेळतात. त्यामुळे अशा खेळावर नियंत्रण आणण्यात अडचण नाही. मात्र, डार्कनेटवर सुरु असलेले गेम थांबवणे कठीण आहे. त्यामुळे यासंदर्भात कडक नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारला विनंती केली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.