शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 28 नोव्हेंबर 2019 (16:31 IST)

पुण्यातल्या प्रसिद्ध गणपती मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी पळवून नेली

पुण्यातल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाच्या गणेश मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी पळवून नेली. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या आणि विश्रामबाग व फरासखाना अशा दोन मुख्य पोलीस ठाण्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर असलेल्या ऐतिहासिक गणपती मंदिरात २६ नोव्हेंबर २०१९ रोजी पहाटे ३ वाजून ३१ मिनिटांनी दोन अज्ञात चोरट्यांनी गणपती मंदिराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करून दान पेटी चोरून नेली. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असल्याची माहिती ट्रस्टचे कायदा सल्लागार अॅड. मिलिंद पवार यांनी दिली.

गणपती मंदिरात स्टीलची असलेली दोन फूट आकाराची दानपेटी अनेक वर्षांपासून ठेवलेली आहे. सदरची दानपेटी दरवर्षी गणेशोत्सवात पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी अनंत चतुर्थीच्या दिवशीच सर्व विश्वस्तांसमोर उघडली जाते. २६ नोव्हेंबर २०१९ रोजीच्या पहाटे २.३१ वाजता दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी मंदिराचा दरवाजा तोडून थेट दानपेटीच चोरून नेली आहे. सीसीटीव्हीमध्ये हा सगळा प्रकार स्पष्टपणे दिसत आहे. या प्रकरणी ट्रस्टचे सचिव दिलीप आडकर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यापूर्वीही श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवन उडवून देण्याच्या धमक्या आल्या होत्या. देशातील पहिला सार्वजनिक गणपती अशी ख्याती आहे.