चंद्रकांत पाटलांची सुप्रिया सुळेंवर टीका, 'आरक्षण मिळत नसेल तर, घरी जा आणि स्वयंपाक करा'
"ओबीसी आरक्षण मिळत नसेल तर राजकारणात कशाला राहता, घरी जा आणि स्वयंपाक करा," अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे.
"ओबीसी आरक्षण संदर्भात मध्य प्रदेशने दोन दिवसांत असं काय केलं माहीत नाही. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी संपर्क केला, पण त्यांनी दिल्लीत जाऊन काय केले हे सांगितलं नाही," असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी वरील वक्तव्य केलं.
"तुम्ही खासदार आहात, तुम्हाला मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची ते कळत नाही? आता तुमची घरी जाण्याची वेळ आली आहे. तुम्ही दिल्लीत जा, मसनात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या," असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
यानंतर सुप्रिय सुळे यांचे पती सदानंद सुळे यांनी या भांडणात उडी घेऊन सोशल मीडियावर पोस्ट लिहिलीय.
त्यात ते म्हणतात, "महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष हे सुप्रियांबद्दल बोलत आहेत. मला नेहमीच वाटत होतं की हे स्त्रीद्वेषी आहेत. जिथं शक्य होईल तिथं महिलांचा अपमान करतात. मला माझ्या पत्नीचा अभिमान आहे. ती गृहिणी आहे. आई आहे आणि यशस्वी राजकारणी आहे. देशातल्या इतर मेहनती आणि गुणवान महिलांप्रमाणे. चंद्रकांत पाटलांनी सर्वच महिलांचा अपमान केलाय."