बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 22 सप्टेंबर 2022 (07:41 IST)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्धव ठाकरे यांच्या आरोपांना थेट दिल्लीतून प्रत्युत्तर

eknath shinde
४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेतील गळती थांबताना दिसत नाही. यातच शिंदे गटाला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर प्रथमच उद्धव ठाकरे  यांनी मुंबईतील गोरेगाव येथे गटप्रमुखांच्या मेळाव्याला जाहीररित्या संबोधित केले. यावेळी शिंदे गट आणि भाजपवर खास ठाकरे शैलीत तोफ डागली. मात्र, उद्धव ठाकरे यांचे संबोधन संपते न् संपते तोच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या आरोपांना थेट दिल्लीतून प्रत्युत्तर दिले.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र सदनात आयोजित एका सभेला संबोधित करत होते. यावेळी शिंदे यांनी बंडामागचे कारण आणि तत्कालीन परिस्थितीचा पुनरुच्चार करत उद्धव ठाकरे यांनी केलेले वार तत्काळ पलटवून लावले. अडीच वर्षानंतर गटप्रमुखांची आठवण आली का, असा रोकडा सवाल एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना केला.
 
आम्ही मिंधे गट नाही तर बाळासाहेबांचे खंदे समर्थक
 
आम्हाला मिंधे गट म्हणाले, आम्ही बाळासाहेबांचे खंदे समर्थक आहोत. दोन्ही काँग्रेससोबत तुम्ही सत्तेसाठी मिंधेपणा केला. आम्हाला आस्मान दाखवणार म्हणालात, तीन महिन्यापूर्वी आम्ही तुम्हाला आस्मान दाखवले आहे. आम्हाला मिरचीचा ठेचा देणार, अहो आम्ही ठेचा खाऊनच मोठे झालो, म्हणूनच आम्ही त्यांना ठेचले आहे. महाविकास आघाडीला खाली खेचणे शक्य नव्हते. बाळासाहेबांचे विचार पुढे नेणाऱ्या आम्हाला बाप चोरणारी टोळी म्हणता, मग आम्ही तुम्हाला बापाचे विचार चोरणारी टोळी म्हणायचे का?, असा खोचक सवाल एकनाथ शिंदे यांनी केला.