राज्यातील महाविद्यालये 15 फेब्रुवारी पर्यंत बंद, परीक्षा ऑनलाईन होणार
राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला बघता राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील सर्व महाविद्यालय आणि तंत्रशिक्षण संस्था 15 फेब्रुवारी पर्यंत बंद राहतील. सर्व विद्यापीठांनी परीक्षा देखील ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.
मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, कुलगुरू ,विभागयुक्तांशी ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीत कोरोनाच्या संसर्गाचा प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेत विद्यार्थीच्या आरोग्याची काळजी घेऊन चर्चा करून राज्यातील महाविद्यालये 15 फेब्रुवारी पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सर्व विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतील. विजेची अनुपलब्धता, किंवा नेटवर्क कनेक्टिव्हीटी किंवा विद्यार्थी किंवा त्याच्या कुटुंबियांच्या कोरोनाबाधित असल्यास त्याचे वर्ष वाया जाऊ नये याची खबरदारी देखील सर्व विद्यापीठाने घ्यावी आणि या निर्णयाचं पालन खासगी विद्यापीठाने देखील करावे असे तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.