सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 5 जानेवारी 2022 (15:31 IST)

महिला काँग्रेसमधील असंतोष चव्हाट्यावर; १८० पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

नागपूर : नागपूर महिला काँग्रेसमधील असंतोष चव्हाट्यावर आला आहे. मनपा निवडणुकीच्या आधीच १८० महिला पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने पक्षासमोर आव्हान उभे ठाकले. नागपूर शहर अध्यक्षपदी नॅश अली यांची नियुक्ती होताच असंतोष उफाळून आला. महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव प्रज्ञा बडवाईक यांच्यासह १८० जणांनी राजीनामे दिले. नॅश अली यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
 
नॅश अली यांनी शहर महिला काँग्रेसचं शहराध्यक्ष बनविण्यात आलं. त्यामुळं महिला काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर आहे. शहराध्यक्ष पदावरून प्रदेश सचिवपदी पदोन्नती देण्यात आलेल्या प्रज्ञा बडवाईक यांनी राजीनामा दिला. त्यांच्यासह १८० महिला पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले. यामध्ये विभागीय अध्यक्ष आणि ब्लॉक अध्यक्ष यांचाही समावेश आहे.
 
२०१४ पासून सक्रिय महिला कार्यकर्त्यांला शहराध्यक्षपदाची जबाबदारी द्यायला हवी होती. परंतु, तसे काही झाले नसल्याचा आरोप प्रज्ञा बडवाईक यांनी केला. महिला काँग्रेसच्या बैठकीत नॅश अली यांच्या नियुक्तीला विरोध करण्यात आला. नॅश अली यांच्याशी वैयक्तिक द्वेष नसल्याचं बडवाईक यांनी म्हटलं. पण, पक्षातील अनोळखी व्यक्तीला शहराध्यक्षपद कसं दिलं जातं, असं त्यांचं म्हणणंय.
 
नागपूर महापालिका निवडणुकीपर्यंत जुनी कार्यकारिणी कायम ठेवण्याची मागणी करण्यात आली. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महिला काँग्रेस अध्यक्ष यांनी पत्र पाठविण्यात आलं. येत्या सात दिवसांत निर्णय न घेतल्यास आम्ही वेगळी वाट धरू असा इशारा देण्यात आलाय. नॅशी अली यांच्या नियुक्तीला प्रज्ञा बडवाईक यांनी सुरुवातीपासूनच विरोध केला. नॅश अली या स्थानिक पातळीवर सक्रिया नाहीत. त्यांनी मुंबई, दिल्लीच्या वाऱ्या केल्यामुळं हे पद मिळालंय.