गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 1 फेब्रुवारी 2021 (07:41 IST)

सीरमला दिलासा, लसीचे ‘कोविशिल्ड’ नाव कायम राहणार

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं तयार केलेल्या ‘कोविशिल्ड’ या कोरोना लसीच्या ट्रेडमार्कवरुन वाद निर्माण झाला असून या विरोधात दाखल याचिका पुण्याच्या सत्र न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे सीरमला दिलासा मिळाला असून कंपनीच्या लसीचे ‘कोविशिल्ड’ हे नाव कायम राहणार आहे. ‘कुटिस बायोटेक’ या कंपनीने सीरम विरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती.
 
कुटिस बायोटेकने ४ जानेवारी रोजी दाखल याचिकेत म्हटलं होतं की, कंपनीने सीरमच्या आधीच कोविशिल्ड या नावाचा वापर केला आहे. त्यामुळे आमच्याकडेचं हे नाव वापरण्याचा अधिकार आहे. यावर सीरमने आपली बाजू मांडताना कोर्टाला सांगितलं की, दोन्ही कंपन्या भिन्न उत्पादन श्रेणीमध्ये काम करतात, त्यामुळे ट्रेडमार्कवरुन भ्रम निर्माण होण्याचे कारण नाही. अॅड. हितेश जैन यांनी सीरमची बाजू कोर्टात मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने कुटिस बायोटेकची याचिका फेटाळून लावली. मात्र, या कंपनीने कोर्टाच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात अपील करण्याचा निर्णय घेतला आहे.