बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 14 मार्च 2022 (21:42 IST)

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे सूचक ट्विट;

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सपशेल अपयश आले आहे. एवढच नाहीतर हातात असलेल्या पंजाब सारख्या राज्याची सत्ता देखील गमावली आहे. यानंतर आता काँग्रेसच्या नेतृत्व बदलाबाबत पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झालेल्या आहेत. या पार्श्वभूमीवरच काल काँग्रेसची कार्यकारी समितीची बैठक देखील सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. एकीकडे या घडामोडी घडलेल्या असताना दुसरीकडे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठा दावा केला आहे.

‘२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच सर्वाधिक जागा मिळवील. पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल’, असा मोठा दावा पटोले यांनी केला आहे. पटोले यांच्या या दाव्याने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीत काय प्रतिक्रिया उमटणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण यापूर्वीही पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचा दावा करत ‘एकला चलो रे’चा नारा दिला होता. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून तिखट प्रतिक्रियाही उमटल्या होत्या.
दरम्यान केंद्रात सत्तेचा दुरूपयोग करून भाजपाने ब्लॅकमेलिंगचे राजकारण चालविले आहे. काँग्रेससह सर्व विरोधकांना नामोहरम करण्यासाठी त्यांच्या मागे ईडी, सीबीआयची चौकशी लावायची आणि विरोधकांना जेरीला आणायचे हीच मोदी सरकारची सूडभावनेची कार्यसंस्कृती राहिली आहे. जे विरोधक शरण येणार नाहीत, त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावायचा आणि तरीही विरोधक शरण येत नसतील तर त्यांच्या ताब्यातील राज्य सरकार पाडण्याचे कट कारस्थान रचण्यात येते. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपाने नेहमीच खटाटोप करून पाहिला आहे. परंतु काही केले तरी हे सरकार कोसळत नाही. म्हणून खोटे आरोप करून रान पेटवायचे काम भाजपाने सुरू केले आहे. सामान्य जनताही भाजपाला ओळखून आहे, असे नाना पटोले यांनी काल सोलापुरमध्ये माध्यमांशी बोलताना म्हटलेले आहे.