शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 23 मे 2021 (10:00 IST)

कोरोना रुग्ण रोजगार हमीच्या कामावर, रोहयो मंत्री भुमरे यांच्या गावातच गैरव्यवहार

रोजगार हमी खात्याचे मंत्री संदीपान भुमरे यांच्या पाचोड गावात धनदांडग्यांच्या नावावर रोहयोचे जॉबकार्ड तयार करून लाखो रुपये लाटल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे.
 
पैसे लाटताना कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेणारे रुग्ण रोहयोच्या कामावर दाखवण्याचा प्रताप यंत्रणेने केला आहे. पाचोड ग्रामपंचायतीचे सरपंच रोहयो मंत्री भुमरे यांचे पुतणे शिवराज भुमरे असताना हा प्रकार उघड झाला आहे
पैठण तालुक्यात मजुरांसाठी रोहयोअंतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे मंजूर आहेत. या कामावर मजुरांना पाठवण्याऐवजी धनदांडगे व्यापारी, वकील, कारखान्याचे एमडी, निमशासकीय कर्मचारी, कामावर दाखवून मोठी रक्कम लाटल्याचा प्रकार समोर आला आहे. हे स्पष्ट झाल्यानंतर संबंधितांनी आम्ही रोहयोच्या कामावर नव्हतोच, तसंच आम्हाला याबाबत काहीही माहिती नसल्याचं सांगितलं.
 
अंबड (ता. जालना) हद्दीत येणाऱ्या बीड बायपास ते साजेगाव हा रस्ता पाचोड ग्रामपंचायतीद्वारे रोहयोतून उरकण्यात आला.
 
रोहयोच्या कामात जर काही गैरप्रकार घडला असेल तर कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही असे रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी स्पष्ट केले.