सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 18 डिसेंबर 2021 (10:32 IST)

बंगळुरूत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना

कर्नाटकची राजधानी बंगळुरूत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना घडली आहे. परवा रात्री ही घटना घडली.
 
या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर पसरल्यानंतर बेळगाव, कोल्हापूर भागात नागरिकांनी या घटनेविरोधात रसत्यावर उतरत संतप्त भावना व्यक्त केल्या.
 
बंगळुरूतील घटनेच्या निषेधासाठी बेळगाव शहरात काल धर्मवीर संभाजीराजे चौकात शेकडो तरुण एकवटले होते. तसंच कोल्हापुरातही तरुणांनी एकत्र येत निषेध व्यक्त केला. कन्नड व्यावसायिकांचे हॉटेल्स बंद करण्यात आली.
बेळगावात आज (18 डिसेंबर) सकाळीही छत्रपती शिवाजी महाराज उद्यान इथं शेकडो नागरिक एकत्र जमणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी पोलिसांना निवेदन देण्यात येणार आहे. बेळगाव शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
 
गुन्हेगाराला तातडीनं अटक व्हावी - एकनाथ शिंदे
शिवसेना नेते आणि सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला.
 
एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवर लिहिलं आहे की, "कर्नाटक राज्यातील बंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या गुंडांचा आम्ही तीव्र निषेध करतो. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सर्व शिवप्रेमींच्या मागे महाराष्ट्र सरकार ठामपणे उभे आहे."
"कर्नाटक सरकारने बेळगाववर हक्क सांगण्यासाठी तिथे अधिवेशनाचा घाट घातलाय, त्याचाही तीव्र निषेध. बंगलोरमधल्या गुन्हेगाराला तातडीने अटक व्हावी आणि अनधिकृत लाल-पिवळ्या ध्वजाचं स्तोम थांबवावं," असं एकनाथ शिंदे म्हणाले.
 
"मराठी जनतेवरच्या अन्यायामुळे आपण यशस्वी होऊ असा कर्नाटकचा समज असेल तर त्यांनी तो मनातून काढून टाकावा. रस्त्यावरच्या आणि न्यायालयातल्या दोन्ही लढ्यांत विजय मिळेपर्यंत महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही," असा विश्वासही एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला.