बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 19 जून 2022 (10:02 IST)

विधानपरिषद निवडणूक :देवेंद्र फडणवीस म्हणतात, 'एकमेकांची मतं फोडण्यासाठी महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू'

devendra fadnavis
विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. राज्यसभा निवडणुकीतील भाजपच्या रणनीतीमुळे महाविकास आघाडीनेही यावेळी कंबर कसल्याचं दिसून येत आहे.
 
महाविकास आघाडी आणि भाजप दोन्ही गोटात जोरदार हालचाली सुरू आहेत. या निवडणुकीत पाचव्या जागेवरील उमेदवार कसा निवडून आणायचा, यासाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल संध्याकाळी भाजप आमदारांसोबत बैठक घेतली आहे.
 
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.
 
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की, "कुठल्याही परिस्थितीत भाजपची मत कमी करण्यासाठी रवी राणा यांना नोटीस बजावण्यात आलीये. पण असं करता येणार नाही. तिन्ही पक्ष एकमेकांची मतं फोडण्यासाठी अपक्ष आमदारांना फोन करत आहेत. त्यांच्या समन्वय नाही. आघाडीतील असंतोष आम्हाला जिंकून देईल."
 
तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं, "भारतीय जनता पक्षाचे सरकार विरोधी पक्षांना त्रास देण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचे चित्र देशभरात आहे. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी, त्यांना भिती घालण्यासाठी या यंत्रणांचा सर्सास गैरवापर सुरु असून विधान परिषद निवडणुकीतही या यंत्रणांच्या माध्यमातून आमदारांवर दबाव टाकला जात आहे.
 
"आमदारांना थेट फोन केले जात आहेत, याची सर्व माहिती आमच्याकडे असून वेळ आली की ही माहिती समोर आणू."
 
पुन्हा एकदा रंगणार सामना?
राज्यसभा निवडणुकीच्या वेळी रंगलेला सामना राज्यात विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा रंगण्याची शक्यता दिसत आहे.
 
विधान परिषद निवडणुकीसाठी 10 जागांसाठी 20 जून रोजी निवडणूक होणार आहे. 10 जागांसाठी 11 उमेदवार मैदानात असल्यामुळे घोडेबाजाराला ऊत येण्याची शक्यता आहे.
 
राज्यसभेच्या निवडणुकीवेळीही महाविकास आघाडीतर्फे आमदारांना एका हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवण्यात आलं होतं. मतदान कसं करायचं, याच्या तंतोतंत सूचना दिल्या होत्या.
 
तरीही ऐनवेळी शिवसेनेच्या उमेदवाराला हार पत्करावी लागली. आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतर्फे अधिक खबरदारी घेतली जात आहे.
 
एकही आमदार फुटू नये, यासाठी सरकारकडून काळजी घेतली जात आहे. ऐनवेळी दगाफटका होऊ नये, यासाठी आमदारांना दोन दिवस आधीपासूनच हॉटेलमध्ये मुक्कामी बोलावण्यात आलं आहे.
 
शिवसेना आमदार पवई येथील रेनेसॉ हॉटेलमध्ये
राज्यसभा निवडणुकीत धक्का बसल्यानंतर विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून जास्तीची खबरदारी घेण्यात येत आहे.
 
शिवसेनेचे आमदार तसेच सेना समर्थित अपक्ष आमदारांना काल दुपारपासून पवई येथील रेनेसॉ हॉटेलमध्ये दाखल होण्याचे आदेश दिले आहेत. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला हॉटेलमध्ये प्रवेश न देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
 
या हॉटेल परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. त्यामुळे हॉटेल रेन्सॉ परिसराला आता जणू छावणीचंच रुप आलं आहे.
 
भाजपचे आमदारही आजपासून हॉटेलात
सत्ताधारी पक्षासोबत भाजपच्या आमदारांनाही आजपासून हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवण्यात येणार आहे. मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल ताज प्रेसिडेंनसमध्ये भाजपच्या सर्व आमदारांचा मुक्काम असणार आहे.
 
राज्यसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा भाजपच्या आमदारांना याच हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते.
 
राष्ट्रवादीचे आमदार ट्रायडंटमध्ये
राष्ट्रवादीच्या आमदारांनाही आजपासून मुंबईत दाखल होण्यास सांगितलं गेलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयातून तसे निरोप आमदारांना देण्यात आले आहेत. त्यानुसार राष्ट्रवादीचे सर्व आमदार आज मुंबईत दाखल होणार असून त्यांना दोन दिवसांसाठी ट्रायडंट हॉटेल येथे ठेवण्यात येणार आहे.
 
काँग्रेसची हॉटेलसाठी शोधाशोध
एकीकडे सर्व पक्षांची रणनीती आखली जात असताना काँग्रेसकडून मात्र हॉटेलसाठी शोधाशोध सुरू आहे. दक्षिण मुंबईतीलच एखादे हॉटेल आमदारांच्या दोन दिवसांच्या पाहुणचारासाठी निश्चित करण्यात येणार आहे.