सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 24 ऑगस्ट 2019 (10:23 IST)

धर्मा पाटील यांच्या विधवा पत्नीला नजरकैदेत ठेवता

सरकारला सत्तेची एवढी मस्ती कशासाठी - अजित पवार 
शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात आत्महत्या केली होती. त्यांच्या विधवा पत्नी मुख्यमंत्र्यांच्या #महाजनादेश यात्रेच्या ठिकाणी आंदोलन करतील म्हणून नजरकैदेत ठेवले जाते. हा सरकारचा कारभार? ...सत्तेची एवढी मस्ती...एवढा माज...कशासाठी असा संतप्त सवाल विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी #गंगाखेड येथील जाहीर सभेत सरकारला केला. शिवायसत्ता येते - जाते हेही लक्षात घ्या असा निर्वाणीचा इशाराही सरकारला दिला.
 
राज्यातील शिक्षकांनी आज आपले अवयव विकायला काढले आहेत हे काय चाललंय राज्यात असा सवाल करतानाच अशा घटनांची जबाबदारी कुणाची आहे. ही सरकारची जबाबदारी नाही का? असे सरकारला ठणकावून विचारले. या दळभद्री सरकारमुळे लोक महाराष्ट्रात जीव देवू लागले आहेत असं का करत आहेत याचा विचार सरकार करताना दिसत नाही असेही अजित पवार म्हणाले.
 
अंमली पदार्थाचे सेवन महाराष्ट्रात वाढले आहे हे कशाचे द्योतक आहे तर वाढलेली बेरोजगारी आहे. डान्सबार बंदी आमच्या आबांनी केली होती परंतु या सरकारने हे डान्सबार पुन्हा सुरु केले. युवा पिढी बर्बाद करण्याचे काम केले जात आहे. मध्यंतरी या सरकारने घरपोच दारु देण्याचा निर्णय घेतला होता प्या आणि जा चंद्रावर अशी भावना सरकारची होती असेही अजित पवार म्हणाले.
 
सरकारविरोधी बोलणार्‍यांवर ईडीचे लिंबू फिरवले जातेय - धनंजय  मुंडे 
सरकार विरोधी कोण बोलेल त्याच्याविरोधात 'ईडी' चे लिंबू फिरवले जात असल्याचा उपरोधिक टोला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गंगाखेडच्या जाहीर सभेत सत्ताधाऱ्यांना लगावला.
 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत सरकारविरोधात लाव रे तो व्हिडिओ असा जोरदार हल्लाबोल केला होता म्हणूनच त्यांना ईडीची नोटीस बजावली होती असेही धनंजय मुंडे म्हणाले. राज्यातील शेतकऱ्यांना ना कर्जमाफी, ना दुष्काळ अनुदान... आणि पीक विमा भरुनही शेतकऱ्यांना अनुदान मिळत नाहीय असा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला.