शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 16 ऑक्टोबर 2021 (08:59 IST)

दसरा मेळावा : भाजपला लक्ष्य करणं हे उद्धव ठाकरेंच्या वाढलेल्या महत्त्वाकांक्षेचं प्रतिक?

विजयादशमीच्या मुहुर्तावर मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणाच्या माध्यमातून थेट भाजपच्या विरोधात एल्गार पुकारला आहे.भाजपनं कोणत्याही पद्धतीनं हल्ले करण्याचा प्रयत्न केला तरी त्याची पर्वा न करता, अंगावर येणाऱ्याला सोडणार नाही असा थेट इशारा त्यांनी दिल्याचं पाहायला मिळालं.
 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या भाषणाच्या माध्यमातून भाजपवर हल्ला करताना, हिंदुत्व, केंद्राचा हस्तक्षेप, केंद्रीय संस्थांचा गैरवार अशा अनेक मुद्द्यांना हात घालत अत्यंत परखडपणे मुद्दे मांडले.
 
राज्यात प्राप्तीकर विभागाच्या कारवाया आणि गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहाता उद्धव ठाकरे नेमके काय बोलणार याकडं सगळ्याचंच लक्ष लागलं होतं.
उद्धव ठाकरे यांनी अत्यंत आक्रमकपणे भाजपला विरोध दर्शवला आहे. मात्र त्यांच्या संपूर्ण भाषणाचा अन्वयार्थ कसा लावायचा, याबाबत काही राजकीय विश्लेषकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.
 
आत्मविश्वास आणि आक्रमकता
उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या निमित्तानं यावेळी केलेलं भाषण हे अत्यंत आक्रमक होतं, असं मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी व्यक्त केलं."उद्धव ठाकरे यांचं भाषण हे सर्व समावेशक आणि सगळ्या मुद्द्यांचा समावेश असलेलं होतं. चिरडून टाकू, जागेवर ठेचू अशी शिवसेनेची किंवा ठाकरी भाषा वापरून त्यांनी, अत्यंत थेटपणे मुद्दे मांडले" असंही, देसाई म्हणाले.
 
तर, उद्धव ठाकरे यांच्या भाषणात आजवर न दिसलेला आत्मविश्वास दिसून आल्याचं ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे म्हणाले.
 
''सरकारला दोन वर्ष झाल्यानंतर हा आत्मविश्वास मुख्यमंत्र्यांमध्ये पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी चिपी विमानतळ उद्घाटनाच्या भाषणात असा आत्मविश्वास होता आणि तो दसरा मेळाव्याच्या भाषणात पुन्हा दिसला," असं चोरमारे म्हणाले.
 
सत्ता आणि सत्तेला धोका नसल्याच्या निश्चिंततेमधून हा आत्मविश्वास दिसून येत असल्याचं मतही विजय चोरमारे यांनी व्यक्त केलं.
 
"राज्यातल्या छापेमारीच्या सत्रानंतर उद्धव ठाकरे दबावात येणार का? अशा चर्चा सुरू होत्या. पण कितीही दबाव आला तरी उद्धव ठाकरे आता भाजपबरोबर जाणार नाही हे आजच्या त्यांच्या भाषणावरून दिसून आलं," असं मत राजकीय पत्रकार दीपक भातुसे यांनी मांडलं.
 
तुमचं हिंदुत्व आणि आमचं हिंदुत्व
"महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून, शिवसेनेवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आरोप झाले आहेत. मात्र उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेनं हिंदुत्व सोडलेलं नाही, हे जाणीवपूर्वक ठसवण्याचा प्रयत्न या भाषणाद्वारे केला," असं चोरमारे म्हणाले.
 
झुंडबळी आणि इतर घटनांचे दाखले देत अशा प्रकारचं 'नवहिंदुत्व' आमचं नसून, सर्वांना सामावून घेणारं असं शिवसेनेचं हिंदुत्व असल्याचं ठाकरेंनी सांगितल्याचं चोरमारेंनी सांगितलं.
तर, "भाजपसारखं हिंदुत्वाचं राजकारण करणार नाही, हे उद्धव ठाकरेंनी भाषणातून ठासून सांगितलं", असं हेमंत देसाई म्हणाले. शिवसेना आता पूर्वीसारखं काही करत नाही. उलटं कोरोनाच्या काळात विरोध पत्करुन ठाकरे यांनी मंदिरं बंद ठेवली. पण तसं असलं, तरी हेच सगळ्यांना सोबत घेऊन चालणारं हिंदुत्व असल्याचं ठाकरे यांनी भाषणातून मांडलं, असंही ते म्हणाले.
 
"हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप देशभरात मुस्लीम विरुद्ध हिंदु असं वातावरण करुन ध्रुवीकरणाचा प्रयत्न करत आहे. मात्र हिंदुत्व म्हणजे मुस्लीम विरोध नाही. तर भाजपचं हिंदुत्व आणि आपलं हिंदुत्व वेगळं असल्याचं सांगण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला," असं दीपक भातुसे म्हणाले.
 
संघाबरोबरचे संबंध सांभाळण्याचा प्रयत्न
उद्धव ठाकरे यांनी भाषणातून भाजपला थेट आव्हान दिलं असलं तरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सरसंघचालक यांच्याशी संबंध चांगले राहतील याचा प्रयत्नही त्यांनी केला, असं मत हेमंत देसाईंनी मांडलं.
 
"शिवसेनेला बरोबर घ्यावं अशी संघाची सुरुवातीपासूनची इच्छा होती. त्यामुळं संघाची सहानुभूती कायम राहावी, यासाठी उद्धव ठाकरे यांनी भाषणातून प्रयत्न केल्याचं दिसून आलं," असं देसाई म्हणाले.
 
मोहन भागवत, संघ, सावरकर हे त्यांना भाजपशी जोडणारे मुद्दे आहेत. भविष्यात कधीही ते पुन्हा याद्वारे एकत्र जोडू शकतात, त्यामुळं त्यांना हा पूल कायम ठेवायचा असल्याचंही विजय चोरमारे म्हणाले.
 
'केंद्रासमोर झुकणार नाही'
केंद्रानं कितीही धमक्या दिल्या तरी आम्ही अजिबात वाकणार नाही. पश्चिम बंगालचं उदाहरण समोर आहे. त्याचप्रमाणे आपल्याला करायचं आहे, असं सांगत उद्धव ठाकरेंनी स्पष्ट संदेश दिल्याचं हेमंत देसाई यांनी सांगितलं.
 
सीबीआय, ईडीकडून होणारा त्रास, त्यात कुटुंबीयांना गोवणं अशा प्रकारांना भीक घालणार नसल्याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले. तसंच हर्षवर्धन पाटलांचा उल्लेख करत त्यांनी, अशा प्रकारांनी झुकणार नसल्याचं अप्रत्यक्षपणे सांगितलं, असंही देसाई म्हणाले.
 
"भारतीय जनता पार्टीकडून स्थानिक आणि केंद्रीय अशा दोन्ही पातळ्यांवर होणाऱ्या उपद्रवाला उद्धव ठाकरे यांनी थेट आव्हान दिलं आहे. आजवर एवढं थेट आव्हान त्यांनी दिलं नव्हतं. मात्र आता कोणत्याही लढ्याला तयार असल्याची भूमिका उद्धव यांनी मांडली" असं विजय चोरमारे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या विरोधात ठामपणे लढायचं आहे, असा संदेशच या मेळाव्याच्या माध्यमातून दिल्याचं दीपक भातुसे म्हणाले.
 
राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाकांक्षाचे सूचक
संजय राऊत हे त्यांच्या वक्तव्यांमध्ये सातत्यानं उद्धव ठाकरे राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतील असं म्हणत आहेत. त्याच्याशी याचा संबंध हेमंत देसाईंनी जोडला."शरद पवार सध्या केंद्रीय स्तरावर स्पर्धेत नाहीत. ममता बॅनर्जी, राहुल गांधी यांच्याबरोबर शरद पवार हे कदाचित उद्धव ठाकरेंना विरोधी आघाडीमध्ये चेहरा बनवण्याचा प्रयत्न करतील," असंही देसाई म्हणाले.
 
त्यादृष्टीनं उद्धव ठाकरे यांची तयारी भाषणातही दिसून आली. ठाकरे यांनी भाषणात अनेक राष्ट्रीय राजकारणात मुद्द्यांचा उल्लेख केला. उत्तर प्रदेश, शेतकरी आंदोलन यांचा समावेश होता. त्यामुळं उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा त्यादृष्टीनंही विचार करणं गरजेचं असल्याचं मत, देसाईंनी मांडलं.
 
राज्यांमध्ये केंद्राकडून दुजाभाव केला जात आहे. केवळ गुजरातला महत्त्व दिलं जात आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय मुद्देही जोरकसपणे मांडल्याचं विजय चोरमारे म्हणाले.
 
मात्र, तसं असलं तरी राष्ट्रीय पातळीवर ते चेहरा बनू शकतील हे म्हणणं उथळपणाचं ठरेल असं चोरमारे यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवण्यासाठी किंवा तसं महत्त्वं वाढण्यासाठी शिवसेनेची शक्ती नसल्याचं ते म्हणाले.लोकसभेमध्ये शिवसेनेला स्वतंत्र लढल्यास मोठ्या प्रमाणावर जागा मिळणं कठीण आहे. राष्ट्रीय पातळीवर स्थान मिळवण्यासाठी ममता बॅनर्जींसारखी ताकद जागांच्या रुपात शिवसेनेकडं नाही, असं चोरमारे यांनी म्हटलंय.
 
''ममता बॅनर्जी ज्या आक्रमकतेनं भाजपच्या विरोधात उभ्या राहिल्या, तीच भूमिका घेण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न असल्याचं या भाषणातून जाणवलं आहे, असं मत दीपक भातुसे यांनी व्यक्त केलं."ज्या पद्धतीनं केंद्रीय तपास संस्थांच्या कारवाईला ममतांनी राज्यातील संस्थांच्या माध्यमातून कारवाई करत उत्तर दिलं. तसा राज्यातील संस्थाचा वापर महाराष्ट्रात भाजप नेत्यांच्या विरोधात होणार का? हा प्रश्न आहे, आजच्या भाषणातून तसे संकेत मिळाले आहेत," असंही भातुसेंनी म्हटलं.या सर्वाचा विचार करता, "आगामी काळात महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा भाजप विरुद्धचा संघर्ष अधिक तीव्र असेल हे स्पष्ट आहे. फक्त जे पश्चिम बंगालमध्ये घडलं तसं इथं होणार का, हे यातून पाहावं लागेल," असं ते म्हणाले.