एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता
उत्तर महाराष्ट्रातील एक बडा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. या नेत्याला पक्षात प्रवेश देऊन कोणती जबाबदारी द्यायची? याचा निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यालयात जोरदार चर्चा सुरु आहे.
भाजपच्या उत्तर महाराष्ट्रातील नेत्याला पक्षात प्रवेश देण्यासाठी शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयात तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, अमळनेरचे राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील आणि गुलाबराव देवकर इत्यादी नेते उपस्थित आहेत.
उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे प्रतिनिधी म्हणून देवकर आणि अनिल पाटील यांच्याशी पवार चर्चा करत आहेत. तसेच या नेत्याला पक्षात प्रवेश दिल्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील बदलणारी राजकीय गणितं आणि त्यातून राष्ट्रवादीला होणाऱ्या फायद्या तोट्यावरही या बैठकीत चर्चा सुरु आहे. त्याशिवाय या नेत्याला पक्षात संघटनात्मक जबाबदारी द्यायची का? किंवा या नेत्याचा मंत्रिमंडळात समावेश करायचा यावरही या बैठकीत चर्चा केली जात असल्याचं बोललं जात आहे.राष्ट्रवादीत प्रवेश करु इच्छिणाऱ्या या नेत्याचं नाव अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. त्यामुळे भाजपचा हा बडा नेता कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे.