सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 10 जानेवारी 2024 (18:48 IST)

एकनाथ शिंदे गट हीच मूळ शिवसेना, भरत गोगावलेंचा व्हिप वैध, राहुल नार्वेकरांचा उद्धव ठाकरेंना झटका

एकनाथ शिंदे गटालाच मूळ शिवसेना म्हणून मान्यता देत असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे.
 
21 जून 2022 ला शिवसेनेमध्ये फूट पडली. त्यामुळे त्या तारखेनंतर सुनील प्रभूंचा व्हीप लागू होत नाही आणि त्यामुळेच भरत गोगावले यांची व्हीप म्हणून केलेली नियुक्ती योग्य असल्याचंही नार्वेकर यांनी स्पष्ट केलं.
 
सुनील प्रभूंचा व्हीपच लागू होत नसल्याने एकनाथ शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवण्याची याचिकाकर्त्यांची मागणीच योग्य ठरवता येणार नाही, असं नार्वेकरांनी म्हटलं.
 
बैठकीला गैरहजर राहणं हे पक्षातून हकालपट्टीचं कारण होऊ शकत नसल्याचं नार्वेकर यांनी स्पष्ट केलं.
 
या निकालामुळे एकनाथ शिंदे गटाच्या 16 आमदारांना दिलासा मिळाला आहे.
 
शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे 40 आमदार अपात्र ठरणार की उद्धव ठाकरे यांच्या गटातील 14 आमदार अपात्र ठरणार यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज (10 जानेवारी) निकाल दिला.
 
शिवसेनेत झालेल्या ऐतिहासिक बंडानंतर पक्षाच्या दोन्ही गटांनी म्हणजेच शिंदे आणि ठाकरे गटाकडून एकमेकांच्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका दाखल केल्या होत्या.
 
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सप्टेंबर 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत शिवसेनेच्या आमदारांची सुनावणी पूर्ण झाली. त्याचा निकाल राहुल नार्वेकर यांनी वाचून दाखवला.