गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 17 फेब्रुवारी 2021 (08:05 IST)

अखेर 'ती' सापडली, मुलगी दगावल्याने बालिकेचे केले होते अपहरण

नाशिकमध्ये शनिवारी अपहरण करण्यात आलेल्या दिड वर्षाची चिमुकली अखेर सापडली आहे. सोबतच अपहरकर्ता भामटालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, त्या चिमुकलीची अन्‌ आईची भेट घडवून आणली आहे.
 
दरम्यान, पोलिसांनी भामट्याला अटक केली असून, त्याचे नाव सुरेश काळे असल्याचे समजते. तो पंचवटी परिसरात राहतो. मुलीचे अपहरण केले तेव्हापासून तो नाशिक शहरातच तिला घेवून फिरत होता. मात्र पोलिसांच्या तपासाची चक्रे गतिमान होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने चिमुकलीला सीबीएस परिसरात सोडले होते. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तसेच त्या भामट्याचा शोध घेतला असता, तोही पोलिसांना आढळून आला आहे.
 
गेल्या शनिवारी भरदिवसा सिव्हिल हॉस्पिटलमधून दीड वर्षाच्या चिमुकलीला एका भामट्याने पळवून नेले होते. तो भामटा मुलीसह सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. पोलिसांनी त्याचा वेगाने तपास सुरू केला होता. त्याचबरोबर तो कुठेही आढळून आल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले होते. त्याकरिता स्पेशल पथकांचीही नेमकणू केली होती. अखेर त्या भामट्याने चिमुकलीला सीबीएस परिसरात सोडून दिले व पोबारा केला होता. मात्र काही वेळात पोलिसाना त्याच्या मुसक्या आवळण्यात यश आले.
 
पोलिसांनी संशयित काळे यास ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याने दोन महिन्यांपुर्वी त्याची स्वत:ची मुलगी मृत्युमुखी पडल्यामुळे या चिमुकलीचे अपहरण केल्याचे कारण प्रथमदर्शनी पोलिसांना सांगितले आहे.