गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 25 जुलै 2024 (09:40 IST)

फादर फ्रान्सिस दिब्रिटो : धर्मगुरू, लेखक ते वसईच्या पर्यावरण चळवळीतले अध्वर्यू

killa
ज्येष्ठ मराठी साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे दीर्घ आजाराने निधन झालं आहे. ते 82 वर्षांचे होते.
 
मागील काही वर्षांपासून ते आजारी होते. वसईत त्यांनी गुरुवारी (25 जुलै) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.
 
फादर फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे धाराशीव (उस्मानाबाद) येथे पार पडलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. तसंच पर्यावरण रक्षण चळवळींमध्ये त्यांचं मोठ राहिलं आहे. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य आणि पर्यावरण चळवळींवर शोककळा पसरली आहे.
 
याआधी बीबीसीकडून दिब्रिटो यांच्या एकूण कारकिर्दीवर सविस्तर लेख प्रकाशित करण्यात आला होता. वाचकांच्या माहितीसाठी तोच लेख आम्ही पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.
 
4 डिसेंबर 1943 रोजी वसईमधील वटार गावात फादर फ्रान्सिस दिब्रिटो (मूळ नाव जॉन) यांचा जन्म झाला.
 
वसई हे मुंबईच्या उत्तरवेशीवरचं एकेकाळचं शांत जीवन जगणारं गाव अशी 'वटार' ओळख होती. आता शहरीकरणाच्या रेट्याखाली वसई-विरार आणि परिसर बदलला असला तरी वसईला वारशाने मिळालेल्या संस्कृतीच्या खुणा अजूनही टिकून आहेत. 
 
एकाबाजूला समुद्र आणि एका बाजूला सह्याद्री, सदाहरित शेती, भाज्या-फळं-फुलांची पिकं यामुळे वसई आजही तितक्याच डौलात उभी आहे. मौर्य-सातवाहनांपासून मुस्लीम, बौद्ध, पोर्तुगीज, ब्रिटीश राजवटी इथं नांदल्या. त्या सगळ्यांचा प्रभाव या प्रदेशातल्या संस्कृतीवर पडला आहे.
 
16 व्या शतकात पोर्तुगीजांनी भारतात वसाहतीसाठी पाय रोवल्यावर वसईमध्येही त्यांनी आपलं ठाणं निर्माण केलं. 
 
पोर्तुगीजांच्या येण्यांनं त्यांच्या वसाहतींमध्ये धर्मांतरं झाली, त्यात वसईमध्येही धर्मांतरं झाली. तत्पूर्वी वसई आणि परिसरामध्ये सामवेदी ब्राह्मणांची मोठी वस्ती होती.
 
1565 पासून वसईतल्या सामवेदी ब्राह्मणांनी आणि इतर काही समुदायांतील लोकांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. आजही त्यांचे वंशज या परिसरामध्ये राहातात. 
 
वाडवळ, कुपारी समाजातील लोकांनी तेव्हाची सामवेदी ही अनेक भाषांच्या मिश्रणातून तयार झालेली बोली अजूनही टिकवून ठेवली आहे.
 
तसेच भाषेबरोबर वस्त्रं, खाण्याच्या पद्धती आणि विवाहासारख्या समारंभातील चालीरितीही वेगळेपणासह जपलेल्या दिसून येतात. 
 
फादर फ्रान्सिस दिब्रिटो 
याच समुदायामध्ये फादर फ्रान्सिस दिब्रिटो (मूळ नाव जॉन) यांचा वटार गावात 4 डिसेंबर 1943 रोजी जन्म झाला. त्यांच्या घराण्याचे मूळ आडनाव दिब्रित असे होते, त्याचेच रुपांतर दिब्रिटो असे झाले.
 
फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या आईचे नाव सांतान आणि वडिलांचे नाव लॉरेन्स असे होते.  शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी धर्मगुरू होण्याचा निर्णय घेतला.
 
त्यासाठी 1962 साली त्यांनी गोरेगाव इथल्या सेमिनरीमध्ये शिक्षणासाठी प्रवेश घेतला.
 
10 वर्षे विविध विषयांचं शिक्षण घेतल्यानंतर ते 1972 साली धर्मगुरू झाले. त्यानंतर त्यांचे महाराष्ट्रातील विविध गावांमध्ये येणं-जाणं सुरू झालं.
 
वेगवेगळ्या प्रदेशातील लोकांची आणि त्यांच्या प्रश्नांची त्यांच्याशी ओळख झाली.
 
मराठी वर्तमानपत्रांमध्ये वाचकांची पत्रं आणि ललित लेख याद्वारे त्यांनी लेखनाला सुरुवात केली होती.
 
1979 साली ते रोममधल्या रोस्सा इथल्या कॉलिजियो दि सान पावलो या सेमिनरीमध्ये पुढील शिक्षणासाठी गेले.
 
रोममधल्या शिक्षणाच्या काळात त्यांच्यावर पोप जॉन पॉल यांचा मोठा प्रभाव पडला. पोप यांच्यासह मदत तेरेसा यांना भेटताही आलं.  
 
लेखन, संपादन आणि सुवार्ता 
फादर स्टिफन्स यांच्यापासून मराठी साहित्यात ख्रिस्ती साहित्यिकांनी मोलाची भर घातली आहे.
 
यामध्ये मराठीमधली पहिली कादंबरी लिहिणारे बाबा पद्मनजी, नारायण वामन टिळक, लक्ष्मीबाई टिळक, भास्करराव उजगरे, र. ह. केळकर अशा अनेकांचा समावेश आहे.
 
याच मांदियाळीमध्ये दिब्रिटो यांचा समावेश आहे.  वसईमधील सुवार्ता मासिकाचे त्यांनी अनेक वर्षं संपादन केलं.
 
सुवार्ताच्या निमित्ताने अनेक प्रसिद्ध व्यक्तींची, विविध विचारधारेच्या लेखकांची, कवींची, विविध क्षेत्रातील नामवंतांची व्याख्यानं त्यांनी आयोजित केली.
 
'द वे ऑफ द पिलग्रिम' या ग्रंथाचा अनुवाद त्यांनी केला. पॅडी चॅफस्की यांच्या गिदिअन नाटकाचं त्यांनी कृतघ्न नावाने मराठी रुपांतर केले.
 
मदर तेरेसा यांचं चित्रमय चरित्र तसेच तेरेसा यांच्यावरील 'द जॉय ऑफ लिव्हिंग' पुस्तकाचा अनुवादही त्यांनी केला. 
 
त्याचप्रमाणे मुलांचे बायबल, येशूच्या बोधकथा, ख्रिस्ती सण आणि उत्सव ही पुस्तकंही त्यांनी लिहिली आहेत. तसेच बायबलचं मराठीत सुबोध बायबल नावाने रुपांतर त्यांनी केले आहे.  
 
दिब्रिटो यांचा पोप जॉन पॉल दुसरे यांच्या आयुष्यावरील ग्रंथ तसेच निरनिराळ्या अनुभवांवर आधारित 'ओअॅसिसच्या शोधात' हे पुस्तक तसेच 'नाही मी एकला' हे आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे. 
 
हरित वसई आंदोलन 
फादर फ्रान्सिस दिब्रिटो आणि त्यांच्या वसईतल्या सहकाऱ्यांनी नागरी समस्य़ा निवारण समिती या नावाने एक समिती स्थापन केली होती.
 
नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मोर्चा, आंदोलन आणि इतर मदत त्याद्वारे करण्यात येत असे. परंतु दिब्रिटो यांचं नाव महाराष्ट्रभर आणि देश-परदेशात वेगाने पोहोचण्यासाठी कारणीभूत ठरली ती हरित वसई चळवळ.
 
शहरीकरण आणि वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबईबरोबर मुंबईच्या आजूबाजूच्या प्रदेशातही मोठे बदल झाले आहेत.
 
खेड्यांमध्ये टोलेजंग इमारती उभ्या राहू लागल्या. वसईसुद्धा बिल्डरांच्या दबावापासून दूर राहू शकली नाही, इतर गुन्हेगारी, टोळीयुद्धं आणि जमिनीचा व्यवसाय, पाणीउपसा, झाडांची तोड या सगळ्यांनी हातात हात घेतल्यामुळे त्याचं स्वरुप अधिकच भीषण झालं. त्यातून निर्माण झालेल्या समस्येला कसा लढा दिला याबद्दल राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या  ‘नाही मी एकला’ या आत्मचरित्रात त्यांनी लिहून ठेवले आहे. 
 
31 ऑगस्ट 1988 रोजी महाराष्ट्र सरकारने वसई-विरार साठी नवा विकास आराखडा जाहीर केला. या आराखड्यानुसार या परिसरातील 8500 हेक्टर जमीन काँक्रिटीकरणासाठी उपलब्ध करण्यात येणार होती. या आराखड्याविरोधात वसईतले समाजमन एकवटण्यासाठी दिब्रिटो यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
 
त्यांना वसई आणि वसईबाहेरच्या विविध लोकांनी, कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला. यामध्ये दोन्ही बाजूंंनी मतमतांतरे व्यक्त होऊन चर्चाही होऊ लागल्या. वसईसाठी हरित वसई संरक्षण समितीची स्थापना करण्यात आली.  
 
फादर दिब्रिटो यांच्यासह या आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांवर टीकाही होत असे.
 
1 ऑक्टोबर 1989 रोजी हरित वसईने केलेल्या मोर्चामध्ये अनेक नामवंतांसंह, साहित्यिक, कार्यकर्ते आणि तळागाळातल्या लोकांनी सहभाग घेतला.
 
त्याची दखल देशविदेशातील माध्यमांनी घेतली होती.  
 
साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आणि टीका 
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्यावर विविध क्षेत्रातील व्यक्तींकडून तसेच अनेक व्यासपीठांवर, समाज माध्यमांत टीकाही झाली आहे.
 
विशेषतः अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्यावर त्याबद्दल आक्षेप घेण्यात आला.
 
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एक धर्मगुरू कसा असा प्रश्न विचारण्यात आला. तसेच जेसुईट पंथ, सक्तीने झालेले धर्मांतर अशा विषयांवर त्यांनी भूमिका स्पष्ट करावी असा सूर समाजमाध्यमांवर उमटला होता. 
 
त्यावेळेस ते म्हणाले होते, "मी धर्मप्रसार करतो म्हणजे काय करतो? जे प्रभूने सांगितलंय ते सांगतो, की शत्रूवर प्रेम करा, सगळ्यांना सामावून घ्या. गोरगरिबांना कवेत घ्या. याच्यात कोणाला धर्मप्रचार वाटत असेल तर माझा नाईलाज आहे." 
 
संमेलन अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या धर्मगुरू असण्यावरून सुरू झालेल्या वादाविषयी ते म्हणाले होते, "संस्कृतमध्ये म्हटलंय, 'वादे वादे जायते तत्त्वबोधः' म्हणजे वाद जर बौद्धिक असतील तर त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे. मतमतांतरं असतात. अशा वादाला न घाबरता त्याचं स्वागत करायचं. पण अशा प्रकारचा वाद हा निर्माण करण्यात आलेला आहे. त्यांनी त्यांचं मत लोकशाही मार्गाने मांडावं." 
 
"त्यांना त्यांचं स्वातंत्र्य आहे. आपले सगळे आपण लोकशाही मार्गाने सोडवायला हवेत. भारतीय घटनेचं उल्लंघन करू नये. संविधानाने आपल्याला खूप स्वातंत्र्य दिलेलं आहे. पण आमनेसामने वाद न करता, लांबून- दुरून करणं मला जरा अप्रशस्त वाटतं. वाद करणारे सगळे माझे मित्र - भाऊ आहेत. जो सगळ्यांचा बंधू, तो हिंदू."
 
संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांचा प्रभाव 
ज्ञानोबा - तुकोबांच्या संतसाहित्याचा आपल्या विचारांवर आणि लेखनावर मोठा प्रभाव असल्याचं दिब्रिटो यांनी बीबीसी मराठीशी साधलेल्या संवादात म्हटलं होतं.
 
ते म्हणाले, "मी घरी बायबल शिकलो. आणि शाळेत माझी ज्ञानोबा - तुकोबांशी, जनाबाईंशी ओळख झाली. मला त्यांचा लळा लागला. तुकोबा जे सांगतात तेच येशू सांगतो. फक्त त्यांची पद्धत निराळी आहे.
 
मी पुण्याला वारीतही काही वेळ घालवलेला आहे. मला वारीविषयी प्रचंड आकर्षण आहे. मी एम.ए. साठी ज्ञानेश्वर अभ्यासला. त्यांनी सांगितलेली स्थितप्रज्ञतेची लक्षण मी चिंतनासाठी घेतो, प्रवचनातून सांगतो. ही शिकवण मला अचंबित करते. मग हे माझ्या बोलण्यात - लेखनात येणारच" 
 
"मी प्रथम भारतीय आहे. मी जन्मलो ख्रिस्ती कुटुंबात आणि माझा बाप्तिस्मा झाला तेव्हा मी ख्रिस्ती झालो. पण माझी नोंद एक भारतीय म्हणून करण्यात आलेली आहे. मी म्हणीन 'ख्रिस्तनामाच्या सेतूवरुनी आलो मी संतचरणी'." 
 
अध्यक्षपदाचं भाषण 
उस्मानाबाद इथं झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात दिब्रिटो यांनी आपली भूमिका मांडली होती. 
 
ते म्हणाले, "मी साहित्याच्या मंदिरातला सेवक. सारे भारतीय माझे बांधव आहेत हे मी मानतो. मी येशूचा उपासक आहे. त्याची सावली जरी माझ्या अंगावर पडली तरी मी स्वतःला भाग्यवान समजेन. मी संताच्या सहवासात महाराष्ट्रात वाढलेलो आहे. जो मराठी आहे त्याला संतांची गोडी लागलीच पाहिजे. त्या संतांनी माझा अध्यात्मिक पिंड पोसला आहे. मी संतांना विसरू शकत नाही. विशेषत: माझ्या लाडक्या तुकोबांना..." 
 
“जर माणसं जगली नाही टिकली नाही तर तुमचं साहित्य कोण वाचणार. जगण्याचं व्यवहारीकरण झालं आहे. अर्थकारण झालं आहे. त्याची चार कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे ईश्वराशी असलेला संवाद. हे परम सत्य आहे. सर्व बाजूंनी ऱ्हास होताना दिसत आहे. कुणाचाच धाक नसावा अशी स्थिती झाली आहे.
 
God is ground of being असं रॉबिनसन या विचारवंताने म्हटलं आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी. दुसरी गोष्ट म्हणजे आपला निसर्गाशी संवाद तुटला आहे. रात्रीतून 2000 झाडे तोडली गेलीत.
 
तिसरी म्हणजे सत्याशी असलेला संवाद. आपण आत्मकेंद्री बनलेलो आहोत. चौथी गोष्ट म्हणजे आपला एकमेकांशी तुटलेला संवाद. या तुटलेल्या संवादामुळे आपण माणूसपणापासून दूर होऊ शकतो”