दीडशहाण्या बापाने घरीच उपचार केल्याने बाळाचा मृत्यू
एका दीडशहाण्या बापाने आपल्या अवघ्या 14 महिन्यांच्या मुलीवर घरीच उपचार केले. त्यामुळे त्या बाळाचा मृत्यू झाल्याची ह्रदद्रावक घटना नाशिकमध्ये घडली. याप्रकरणी बाळाच्या आईच्या तक्रारीवरून हेमंत शेटे (रा. मखमलाबादरोड, पंचवटी) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
मखमलाबाद रोडवरील पंचवटीतल्या शेटे कुटुंबाच्या अवघ्या चौदा महिन्यांच्या चिमुकलीवर एका रुग्णालयात उपचार सुरू होते. विशेष म्हणजे हे बाळ उपचाराला चांगला प्रतिसाद देत होते. त्याची प्रकृती दिवसेंदिवस सुधारत होती. हे पाहून मुलीच्या बाबाने बाळाला घरी नेण्याची परवानगी मागितली. मात्र, हॉस्पिटलमधील अधिकाऱ्यांनी सध्या उपचार सुरू आहेत. घरी नेऊ नका असे सांगितले. शेवटी जर तुम्हाला घरी न्यायचे असेल, तर स्वतःच्या जबाबदारीवर न्या, असा इशाराही दिला.
आपल्या बाळावर घरी उपचार करायला शेटेच्या पत्नीने विरोध दर्शवला. तेव्हा शेटेने आपल्या कुटुंबाला सांगितले की, मला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. मी एका फार्मा कंपनीत कामाला आहे. त्यामुळे काय उपचार करायचे, ते मला माहित आहे, असे म्हणत त्याने घरातील इतर मंडळींचे म्हणणे अक्षरशः उडवून लावले. त्याने आपली आई व पत्नी या दोघांनाही जुमानेले नाही आणि हट्ट करून बाळाला घरी आणलेच.
बापाने आपल्या अवघ्या चौदा महिन्यांच्या बाळावर घरातच उपचार सुरू केले. मात्र, शेटेला निदान करणे जमलेच नाही. आणि जी भीती होती, तेच झाले. अखेर या चुकीच्या उपचाराने त्या बाळाचा जीव गेला. शेवटी यांच्या आईने पंचवटी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानंतर शेटेला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.