बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 22 फेब्रुवारी 2021 (16:11 IST)

'त्या' भीषण अपघातात पाच ठार

स्विफ्ट कार व ट्रॅव्हल्स एकमेकांवर धडकून औरंगाबाद महामार्गावर देवगड फाटा जवळ झालेल्या भीषण अपघातात कार मधील पाच जणांचा जागीच मृत्यु झाल्याची घटना सोमवारी  पहाटेच्या सुमारास घडली आहे. पहाटेची वेळ असल्याने दोन्ही वाहने भरधाव वेगाने जात असावीत. त्यातच चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बसमधील कोणालाही दुखापत झालेली नाही.
 
औरंगाबादकडून नगरच्या दिशेने येत असलेल्या स्विफ्ट कार (क्रमांक एमएच २१ बीएफ ७१७८) आणि अहमदनगरकडून औरंगाबाद कडे जात असलेल्या ट्रॅव्हल बस (क्रमांक एमएच १९ वाय ७१२३) यांच्यामध्ये देवगड फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघात झाला. यात कारमधील पाच जण जागीच ठार झाले असून अपघातातील मयत जालना जिल्ह्यातील आहेत.
 
अपघाताची माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक भरत दाते,पोलिस नाईक अशोक नागरगोजे,पोलीस नाईक बबन तमनर,पोलीस कॉन्स्टेबल दिलीप कुऱ्हाडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवुन स्थानिकांच्या मदतीने मदतकार्य केले व जखमींना ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा येथे हलवले परंतु सर्व पाच ही जण उपचारापूर्वीच मयत झाले आहे
 
बसच्या समोरील बाजूने कार घुसल्याचे दिसत आहे. त्यामुळे कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. मोठा आवाज झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी तेथे धाव घेतली. रस्त्यात पडलेली वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.