शनिवार, 13 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 5 फेब्रुवारी 2020 (16:27 IST)

आळंदीत चार वर्षीय मुलीवर 14 वर्षाच्या अल्पवयीन आरोपींनं केला बलात्कार

हिंगणघाट येथील महिलेवरील हल्ल्याची घटना ताजी असतानाच एका चार वर्षाच्या मुलीवरील बलात्काराच्या घटनेनं आळंदी हादरले. चार वर्षाची मुलगी बाहेर खेळत असताना 14 वर्षाच्या अल्पवयीन आरोपींनं तिला मोबाईल दाखवून घरात बोलावलं आणि अत्याचार केला. मुलीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर झालेला प्रकार समोर आला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ वर्षीय अल्पवयीन आरोपी आणि पीडित चिमुकली हे एकाच इमारतीत राहतात. आरोपी हा आई-वडील आणि भावासह तळ मजल्यावर राहतो, तर चार वर्षांची मुलगी  पहिल्या मजल्यावर राहते. तळमजल्यावर चिमुकली एकटीच खेळत होती. तेव्हा आरोपीने मोबाईल दाखवून चिमुकलीला घरामध्ये बोलावले आणि तिच्याबरोबर बलात्कार केला. यानंतर आरोपी घरातून पळून गेला. दरम्यान, चिमुकली रडत घरी गेली. तिच्या शरीरातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होत होता. मुलगी पडली असं तिच्या आईला वाटलं. मात्र तिच्या शरीरावरील जखमा बघितल्यानंतर तिच्या सोबत काही अघटित घडलं असल्याचा संशय त्यांना आला. असं कोणी केलं आहे, असं आईनं मुलीला विचारलं. त्यावर ‘दादा’ ‘दादा’ इतकंच चिमुरडी म्हणत होती. त्यानंतर मुलीला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वैद्यकीय अहवालात तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. चिमुकलीवर अद्यापही पुण्यातील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास घडली.
 
फोटो व्हायरल केल्यानं आरोपी सापडला-
 
घटनेनंतर अल्पवयीन आरोपी पळून घरातून पळून गेला. त्यानंतर जवळच्या शेतात जाऊन झोपला होता. तोपर्यंत आळंदी पोलिसांनी आरोपीच्या तपासाठी पथके रवाना केली. काहींनी त्याचा फोटो व्हायरल केला. दुसऱ्या दिवशी (4 फेब्रुवारी) आरोपी नाश्ता करण्यासाठी शेताच्या बाहेर आला तेव्हा एकाने पोलिसांना फोन करून आरोपीबद्दल माहिती दिली. पोलिसांनी तातडीने जाऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.