गिरीशभाऊंना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवावे लागेल
जळगाव जिल्ह्यातील आ.गिरीश महाजन व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यात सध्या चांगलाच कलगीतुरा रंगला असून दोन्ही एकमेकांवर निशाणा साधत आहे. कोरोनाच्या मुद्द्यावरून नाथाभाऊंना ठाण्याला पाठवावे लागेलअसे वक्तव्य शनिवारी आ.महाजन यांनी केले होते. खडसेंनी त्यास जोरदार प्रत्युत्तर दिले असून मला तर ठाण्याची गरज नाही परंतु गिरीशभाऊंना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवावे लागेल असे खळबळजनक वक्तव्य एकनाथराव खडसेंनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे आणि माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांच्यातील वैर सर्वानाच ठाऊक आहे. एकमेकांवर टीका करण्याची संधी दोन्ही नेते सोडत नाही. काही महिन्यांपूर्वी एकनाथराव खडसे यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला असता आ.गिरीश महाजन यांनी, ईडीच्या तारखा पाहून खडसेंना कोरोना होतो अशी टीका केली होती. शनिवारी आ.गिरीश महाजन यांचा कोरोना अहवाल सकारात्मक आल्यानंतर एकनाथराव खडसेंनी त्यावर प्रतिक्रिया देताना, मला तर खरोखर कोरोना झाला होता परंतु सध्या मोक्का कायद्याची चौकशी होणार असल्याचे समजते. त्यामुळेच गिरीश महाजन यांना कोरोना झाला असावा असा मला संशय असल्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले होते.
खडसेंच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत आ.गिरीश महाजन यांनी त्यास जोरदार प्रत्युत्तर दिले होते. नाथाभाऊंना ठाण्याच्या उपचाराची गरज आहे. राज्यात तुमचेच सरकार असून याच सरकारने दिलेली चाचणी खोटी आहे हे त्यांनी सिद्ध करावे असे खुले आव्हान आ.महाजन यांनी दिले होते. महाजनांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देत खडसेंनी जहरी टीका केली असून नाथाभाऊला ठाण्याला पाठविण्याची गरज नसून गिरीश भाऊंना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवावे लागेल असे ते म्हणाले. तसेच जळगावात मोक्का कारवाईच्या संदर्भात पोलिसांचे पथक आले असून काल मी याबाबत बोललो होतो हा निव्वळ योगायोग आहे असेही खडसे म्हणाले.