1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 11 सप्टेंबर 2021 (08:14 IST)

पोलीस पतीकडून हुंड्यासाठी छळ, विवाहितेची आत्महत्या, चौघांविरुद्ध गुन्हा

Harassment for dowry by police husband
लग्नाच्यावेळी हुंड्यात ठरलेल्या २० लाखांच्या रकमेपैकी उर्वरित ३ लाख रूपये आणावे यासाठी पोलीस पतीसह सासरच्या मंडळीकडून होत असलेल्या छळाला कंटाळून २३ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना रामेश्वर कॉलनीत घडली होती.याप्रकरणी विवाहितेच्या वडीलांच्या फिर्यादीवरून पतीसह चौघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला असून यात पोलीस पतीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

एमआयडीसी पोलिसात दाखल गुन्ह्याच्या फिर्यादीनुसार प्रविण श्यामराव पाटील रा.श्रीराम मंदीर चौक मेहरूण यांची लहान मुलगी कोमल हिचा विवाह १३ फेब्रुवारी २०१६ रोजी रामेश्वर कॉलनीतील चेतन अरविंद ढाकणे यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला.चेतन ढाकणे हा भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे.

लग्नाच्यावेळी हुंडा म्हणून २० लाख रूपये देण्याचे ठरले होते.परंतू लग्न थाटामाटात झाल्याने प्रविण पाटील यांनी तेव्हा ७ लाख रूपये दिले. उर्वरित १३ लाख रूपयांपैकी १० लाख रूपये चार महिन्यांपूर्वी घर घेण्यासाठी दिले होते. हुंड्यातील ३ लाख रूपये देणे बाकी होते. दरम्यान, उर्वरित हुंड्यातील ३ लाख रूपये आणावे यासाठी पती चेतन ढाकणे याने विवाहितेला मारहाण, शिवीगाळ आणि मानसिक छळ करत होता. हुंड्याची रक्कम तातडीने आणावी यासाठी सासू मंदाबाई अरविंद ढाकणे, नणंद प्रतिभा ज्ञानेश्वर घुगे आणि जावई ज्ञानेश्वर विठ्ठल घुगे यांनी शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.
 
३ लाखांसाठी होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहिता कोमल हिने दि.९ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडे पाच वाजता राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. मुलीने आत्महत्या केल्याचे कळताच विवाहिता कोमलचे आई-वडीलांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेतली. मुलीचा मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला. यात सासरच्या जांचाला कंटाळून मुलीने आत्महत्या केली असल्याचा आरोप कोमलचे वडील प्रविण पाटील यांनी केला. वडील प्रविण पाटील यांच्या फिर्यादीवरून पतीसह सासरच्या मंडळीविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.