ईडीच्या कारवायांनी महाविकास आघाडी सरकार अस्थिर नाही तर भक्कम होत आहे : शरद पवार
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीचे ससेमीरा लागला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य करताना ईडीच्या कारवायांनी महाविकास आघाडी सरकार अस्थिर नाही तर भक्कम होत आहे, असं प्रतिपादन केलं. तसंच, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय, असा आरोप देखील शरद पवार यांनी केला. तसंच, आम्ही १०० टक्के हे सरकार चालवणार आणि पुन्हा कसं सत्तेवर येईल हे देखील बघणार, असं शरद पवार म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारच्या अनेक मंत्र्याविरोधात ईडीच्या केसेस सुरू आहेत, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात लुक आऊट नोटीस काढण्यात आली आहे, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधात केस आहे, भावना गवळींवर आरोप झालेत, तिथेही छापे मारण्यात आले आहेत, त्यामुळे सरकार अस्थिर होईल असं वाटतं का? असा सवाल शरद पवार यांना करण्यात आला. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना अजिबात सरकार अस्थिर होणार नाही. उलट यामुळे सरकार आणखी भक्कम व्हायला लागलं आहे, असं शरद पवार म्हणाले.
ईडीच्या कारवायांमुळे सरकारमध्ये एकसंघत्व यायला लागलं आहे. कुणी आपल्याला टार्गेट करून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण एक झालं पाहिजे ही भावना आता निर्माण झाली आहे. ही सगळी प्रकरणं राजकीय आकसाने केली जातात. तेच या प्रकरणांमध्ये आपल्याला दिसतंय, असं शरद पवार म्हणाले.