शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 नोव्हेंबर 2021 (15:37 IST)

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची मोठी घोषणा; म्हणाले – ‘शहीद पोलिसांच्या कुटुंबियांना 5 एकर जमीन देणार’

नागपूर : गडचिरोली येथे चकमकीत सहभागी पोलीस अधिकारी आणि सी-60 कमांडोंच्या सत्कारासाठी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील  हे सोमवारी गडचिरोलीत आले होते. पोलीस अधीक्षक कार्यालयात त्यांनी शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. शहीद पोलीस कुटुंबीयांना 5 एकर जमीन देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
 
 गडचिरोलीत शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांशी संवाद साधताना गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले,नक्षलविरोधी अभियानात लढताना शहीद झालेल्या पोलीस जवानांच्या कुटुंबीयांना शेतीसाठी 5 एकर जागा देण्यासह इतर मागण्यांचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे ठेवण्यात येईल.तसेच, चकमकीत जखमी 4 पोलीस जवानांची त्यांनी नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये भेट घेतली.शौर्य गाजवणाऱ्या जवानांना मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आणखी बक्षिसे व पुरस्कार दिला जाईल, असं वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.
 
दरम्यान, चकमकीत सहभागी जवानांना जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून हे बक्षीस दिले जाणार आहे.शासनाच्या नियमानुसार जे काही रिवॉर्ड मिळतात ते मिळतीलच, पण पोलिसांचे मनोबल वाढावे यासाठी हे तत्काळ स्वरूपातील बक्षीस असल्याचे गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे  यांनी सांगितले आहे.