एका घरात दोन पक्षाचे लोक कसे राहू शकतात, हा तर पीएचडीचा विषय : बच्चू कडू
अमरावती : एका घरात दोन पक्षाचे लोक कसे राहू शकतात, हा तर पीएचडीचा विषय आहे, असे म्हणत प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याला टोला लगावला आहे. अमरावतीत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
महत्त्वाचे म्हणजे एकाच घरात दोन पक्षाचे लोक कसे राहू शकतात, यावर संशोधन करणे आवश्यक आहे. खरं तर हा पीएचडीचा विषय आहे. यासाठी मी आता एका व्यक्तीची नियुक्ती करणार आहे. पत्नी भाजपात आणि पती स्वत:च्या पक्षात असल्यावर ते नेमके कोणत्या पक्षात आहेत, यावर संशोधन झाले पाहिजे”, असा टोलाही बच्चू कडू यांनी लगावला.
“रवी राणा यांनी त्यांच्या पक्षाच्या नावाप्रमाणे स्वाभिमान टिकवून ठेवला आहे. यासाठी त्यांचे कौतुक करावे लागेल. नवनीत राणा भाजपात गेल्यानंतर रवी राणा यांनी यांच्या घरावर स्वाभिमानाचा झेंडा कायम ठेवला आहे. मग अशा वेळी भाजपाचा झेंडा कुठे लागेल? असा प्रश्न उपस्थित होतो. ही संभ्रम निर्माण करणारी परिस्थिती आहे”, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.
“रवी राणा यांनी त्यांच्या घरावर स्वाभिमानचा झेंडा कायम ठेवून एक बाजू मोकळी ठेवली आहे. जर या निवडणुकीनंतर काँग्रेस-राष्ट्रवादी पुन्हा सत्तेत आली, ते पुन्हा राष्ट्रवादीबरोबर जातील. जिकडे सत्ता तिकडे रवी राणा, अशी ही रणनीती आहे. याचा विचार आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाने करायला हवा”, असे ते म्हणाले.
Edited by -Ratnadeep Ranshoor