मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 9 जून 2021 (08:07 IST)

राजकारणात जनता रिटेकची संधी देत नसते; अभिनयाकडे परत फिरा”; नवनीत राणांना खोचक सल्ला

मुंबई उच्च न्यायालयाने खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द केल्यानंतर राजकीय प्रतिक्रियांना सुरवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी नवनीत राणा यांच्यावर जोरदार टिका केली आहे. तसेच नवनीत राणा यांच्यामध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी आता खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि अभिनय क्षेत्रात पुन्हा नशीब आजमावून पाहावं, असा सल्ला दिला आहे. अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांना मुंबई उच्च न्यायालयाने धक्का दिला आहे. नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राबद्दल आक्षेप नोंदवत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने खासदार राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं. तसंच राणा यांना दोन लाख रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे. दरम्यान यावर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
 
रुपाली चाकणकर म्हणाल्या, “अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. पण नवनीत राणा यांनी खोटे जातीचे प्रमाणपत्र सादर करून खासदारकी जिंकली. आज उच्च न्यायालयाने यावर जातीचे प्रमाणपत्र खोटे असल्याचा निकाल दिला आहे. नवनीत राणा यांना खरतर रिल लाईफ आणि रिअल लाईफमधील फरक माहित नाही. अभिनय क्षेत्रात तुम्हाला एखादा सीन रिटेक करता येईल. पण अमरावती जनता पुन्हा तुम्हाला रिटेकची संधी देणार नाही. कारण आपण अमरावतीच्या लाखो मतदारांचा अपमान केला आहे. तसेच राज्यघटनेचा देखील अपमान केला आहे. त्यामुळे थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर आपण आता खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि अभिनय क्षेत्रात पुन्हा नशीब आजमावून पाहावं.”
काय आहे प्रकरण?
२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा या अमरावती मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे महत्त्वाचे नेते आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. या निवडणूक निकालानंतर माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायालयाने आज निकाल दिला. उच्च न्यायालयाने हा घटनेवरील घोटाळा आहे, असं मत नोंदवून सदर जात प्रमाणपत्र रद्द करुन नवनीत राणा यांना दोन लाखाचा दंड ठोटावला आहे. तसेच सदरचं खोटं जात प्रमाणपत्र सहा आठवड्याच्या आत शासनाकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. आनंदराव अडसुळ यांच्या वतीने अ‍ॅड. सी. एम. कोरडे, अ‍ॅड. प्रमोद पाटील व अ‍ॅड. सचिन थोरात यांनी बाजू मांडली.
राणा यांची खासदारकी रद्द होणार?
मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द केल्याने त्यांची खासदारी धोक्यात आली असल्याची चर्चा रंगली आहे. निवडणूक आयोगाला सादर केलेलं प्रमाणपत्र किंवा प्रतिज्ञापत्र खोटं ठरलं, तर संबंधित सदस्याचं पद रद्द होऊ शकतं. मात्र आता राणा यांच्याबाबत काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.