मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 26 फेब्रुवारी 2022 (16:19 IST)

मार्चच्या पहिल्या आठवड्यात खान्देशाला उन्हाचा फटका बसणार

राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला आहे. मार्च महिन्यातील पहिला आठवडा जळगावसह धुळे आणि नंदुरबारकरांसाठी सर्वाधिक हाॅट असणार आहे. तर विदर्भासह राज्यातील अन्य विभागासाठी सामान्य असणार आहे.
 
राज्यात गेल्या काही दिवसांत उन्हाचा पारा सातत्याने वाढत असून बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा पस्तीस अंशांच्या वरच आहे. शुक्रवारी जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंशांवर गेले आहे. पुढील आठवड्यात त्यात आणखी वाढ हाेऊन ५, ६ आणि ८ मार्च राेजी पारा ४१ अंशांवर जाईल. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात ५ आणि ६ मार्च राेजी पारा ४१ अंशांवर जाण्याची शक्यता आहे.
 
या तिन्ही जिल्ह्यांत मार्च महिन्यातील पहिला आणि शेवटचा आठवडा अधिक उष्ण राहणार असल्याने पारा ४१ अंशांपर्यंत जाईल. मधल्या पंधरवड्यात मात्र तापमान ३४ ते ३६ अंशांदरम्यान सामान्य असेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
 
विदर्भ अन् मराठवाड्यात मार्चअखेर तापमानात वाढ
मराठवाडा आणि विदर्भात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तापमान ३३ ते ३६ अंशांपर्यंत असेल. दुसरा आणि तिसऱ्या पंधरवड्यात सरासरी ३४ अंशांवर पारा राहील. विदर्भ आणि मराठवाड्यात शेवटच्या आठवड्यात तापमान ३९ अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये तापमान पहिल्या आठवड्यात ३६ अंशांपर्यंत तर २५ मार्चनंतर पारा ३९ अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.