येत्या चार दिवसांत मान्सून राज्यात दाखल होणार
मान्सून केरळमध्ये दाखल झाला असून येत्या चार दिवसांत तो महाराष्ट्रात पोहोचेल, अशी माहिती ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने दिली. तर भारतीय हवामान खात्याने वार्तापत्रात मान्सून २४ तासांत केरळमध्ये येईल असा अंदाज वर्तवला होता. केरळमध्ये मान्सूनच्या आगमनामुळे पावसाळी वातावरण असल्याने पावसाळा सुरू झाला असे आता बोलता येईल, असे ‘स्कायमेट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन सिंग यांनी सांगितले.
केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यावर त्यापुढील २४ ते ४८ तासांत दक्षिण अरबी समुद्र, मालदीव-लक्षद्वीप बेटांचा परिसर, तामीळनाडू आणि बंगालची खाडी या मार्गाने वाटचाल करतो. सिंधुदुर्ग जिल्हय़ात पुढील २४ तासांत गडगडाटासह व सोसाटय़ाच्या वाऱयासह पाऊस पडण्याची व विजा चमकण्याची शक्यता आहे.