केडगाव दुहेरी हत्यांकाड : ‘सीआयडी’तपास नको, पुन्हा ‘एलसीबी’कडे तपास द्या’
केडगाव येथे चार वर्षांपूर्वी झालेल्या शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी आता नवीन मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील (सीयआयडी) अधिकाऱ्यांवर संशय घेण्यात आला असून याचा तपास नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे अर्थात एलसीबीकडे द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
या मागणीसाठी मृतांच्या नातेवाईकांनी मुंबईत आझाद मैदानात उपोषण सुरू केले आहे. सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी आरोपींना जामीन मिळावा, यासाठी मदत केल्याचा या आंदोलकांचा आरोप आहे.
सुमारे चार वर्षांपूर्वी महापालिका पोट निवडणुकीच्यावेळी केडगावमध्ये शिवसैनिक संजय कोतकर व वसंत ठुबे यांचे हत्याकांड झाले होते.या गुन्ह्यातील आरोपींना अलीकडेच जामीन मंजूर झाला आहे. यामध्ये आर्थिक उलाढाल झाल्याचे आरोप करीत कोतकर व ठुबे यांच्या कुटुंबियांनी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील (सीआयडी) संबंधित काही अधिकाऱ्यांनी आर्थिक हितसंबंधांतून चुकीची कागदपत्रे सादर केली.त्यामुळे आरोपींना जामीन मंजूर होण्यासाठी मदत झाली. या अधिकार्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर करवाई करावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.या हत्याकांडाचा तपास पुण्याच्या सीआयडीकडून काढून घेऊन अहमदनगर पोलिस दलातील स्थानिक गुन्हे शाखेकडे म्हणजे एलसीबीकडे द्यावा.
सीआयडीच्या काही अधिकाऱ्यांची नावेही नातेवाईकांनी घेतली असून त्यांच्यावर आरोपींशी आर्थिक तडतोड करून जामीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.उपोषणात संग्राम संजय कोतकर, प्रमोद आनंदा ठुबे, किसन रमेश ठुबे, देवीदास भानुदास मोढवे, अनिता वसंत ठुबे, गणेश रंगनाथ कापसे, नगरसेविका सुनीता संजय कोतकर सहभागी झाले आहेत.