बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 25 फेब्रुवारी 2021 (08:28 IST)

बंजारा क्रांती दलाकडून मुख्यमंत्री यांना संजय राठोड यांची चौकशी करावी असे पत्र

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांना बंजारा समाजाचा पाठिंबा असल्याचं आतापर्यंत दिसत होतं. मात्र, आता एक नवं ट्विस्ट आलं असून बंजारा क्रांती दलाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संजय राठोड यांची चौकशी करावी असं पत्र पाठवलं आहे. हे पत्र भाजपने त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केलं आहे. हे पत्र शेअर करताना भाजपने राज्य सरकार आता तरी चौकशी करणार का? असा सवाल केला आहे.
 
संजय राठोड मंगळवारी तब्ब्ल १५ दिवसानंतर सर्वांसमोर आले. यावेळी मोठ्या प्रमाणात बंजारा समाज त्यांच्या पाठीशी असल्याचं दिसून आलं. मात्र, यात आता नवा ट्विस्ट आला आहे. बंजारा क्रांती दलाने मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी संजय राठोड यांची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. “बीड येथील बंजारा तरुणी पूजा चव्हाण हिच्या कथित आत्महत्या प्रकरणी आपल्या सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांच्याबाबत बंजारा आणि अन्य समाजात मोठे संशयाचे वातावरण निर्माण झाले असून या प्रकरणाची योग्य ती चौकशी होऊन सत्य समाजासमोर येणं आणि दोषींविरुद्ध योग्य ती कायदेशीर कार्यवाही होणे अत्यंत आवश्यक आहे. पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणी महाराष्ट्रातील बंजारा बांधवांच्या भावना प्रक्षुब्ध असून सरकार दोषींना पाठिशी घालत असल्याचे समाजाचे मत बनले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआयमार्फत सखोल चौकशी होऊन दोषींविरुद्ध कार्यवाही करण्यात यावी,” असं या पत्रात लिहिण्यात आलं आहे.